नवविवाहितेच्या खून प्रकरणी थोरली जावेस जन्मठेपेची व दंडाची शिक्षा ; बार्शी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल-Barshi Addistional and Session Court Judgement
सोलापूर : माढा तालुक्यातील मौजे अंजनगाव उमाटे येथे नवविवाहित महिलेचा गळा आवळून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पेटवून दिल्याच्या प्रकरणी बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी थोरली जाऊ गीता शंकर पाडुळे हिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणातील फिर्यादी सिद्धेश्वर जाधव यांची मुलगी उज्वला हिचे लग्न किरण लक्ष्मण पाडुळे यांच्याशी दि. 29 नोव्हेंबर 2022 रोजी झाले होते. लग्नानंतर उज्वला ही सासरी पती, दीर, सासू, सासरे व जाऊ यांच्यासोबत राहत होती. माहेरी जाताना तिने गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व कानातील सोन्याच्या रिंगा कपाटात ठेवून दिल्या होत्या. परत आल्यानंतर दागिने न मिळाल्याने तिने जाऊ गीता पाडुळे हिला विचारणा केली. यावरून दोघींमध्ये वाद झाला होता. चोरीचा आळ घेतल्याचा राग आरोपीच्या मनात होता.
दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी घरात फक्त उज्वला व आरोपी गीता या दोघीच असताना आरोपीने उज्वलाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहास घरातच पेटवून दिले. आत्महत्येचा बनाव करण्यासाठी आरोपीने घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरून कुलूप लावले व किचनच्या दरवाजातून बाहेर-आत येत स्वतःच्या अंगावर चाकूने जखमा करून अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा बनाव रचला. तसेच घटनेच्या वेळी स्वतः शेतात काम करत असल्याचे भासवण्याचाही प्रयत्न केला.
या प्रकरणी मयताचे वडील यांनी माढा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 18/2023 अन्वये गुन्हा दाखल केला. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक श्री शाम बुवा यांनी तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सदर खटला हा पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होता. कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. सरकार पक्षातर्फे एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, घटनास्थळ पंच, आरोपीकडून जप्त चाकू व घराची चावी यावरील पंच, आरोपीची वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टर, मोबाईल संभाषणासंदर्भातील नोडल अधिकारी आदींच्या साक्षींच्या आधारे परिस्थितीजन्य पुरावा सुसंगतपणे मांडण्यात आला. सरकारी वकील श्री दिनेश देशमुख यांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचे दाखले देत प्रभावी युक्तिवाद केला.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. डी. सुभेदार यांनी सर्व पुरावे व युक्तिवादांचा विचार करून आरोपीस भारतीय दंड विधान कलम 302 अन्वये जन्मठेप व 5,000 रुपये दंड (दंड न भरल्यास 6 महिने कारावास) तसेच कलम 201 अन्वये 3 वर्षे कारावास व 2,000 रुपये दंड (दंड न भरल्यास 1 महिना कारावास) अशी शिक्षा सुनावली.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक शाम बुवा व दुय्यम अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महमद शेख यांनी केला. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील दिनेश देशमुख यांनी काम पाहिले, तर फिर्यादीकडून ॲड. धनंजय माने यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवीसाठी पोलीस हवालदार अमृत खेडकर व महिला पोलीस अमलदार रीना शेख यांनी साक्षीदारांना मार्गदर्शन करून न्यायालयात हजर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणात उपविभागीय पोलिस अधिकारी बार्शी अशोक सायकर व पर्यवेक्षण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर यांनी तपास व साक्षीदारांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.

0 Comments