धाराशिव: इंस्टाग्राम स्टेटसवरून दोन गटात तुंबळ हाणामारी; परस्पर विरोधी गुन्हे दाखल, अनेक जखमी-धाराशिव जिल्ह्यातील घटना -Instagram Status Crime News
धाराशिव : इंस्टाग्राम स्टेटस ठेवण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारहाणीमध्ये झाले असून या घटनेत दोन्ही बाजूंचे अनेकजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी भुम पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 24 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास भुम येथील बाजार तळ परिसरात ही घटना घडली. फिर्यादी साहिल गौस शेख (वय 21, रा. कसबा भुम) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तोफीक फिरोज फकीर, सुमेर समीर सय्यद, मोईन फिरोज फकीर, साहील हबीब फकीर, फिरोज ईसाक फकीर, एजाज ईसाक फकीर, राजु दिलावर मुलाणी, नदीम दिरवार मुलाणी, तसलीम एजाज फकीर, जरीना हबीब फकीर व हबीब मौला फकीर (सर्व रा. भुम) यांनी मोबाईलवर स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून एकत्र येत शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्यांनी, स्टॅम्प व दगडाने मारहाण करून साहिल शेख व त्यांच्या नातेवाईकांना जखमी केले.
या तक्रारीवरून भुम पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 189(2), 191(2), 190, 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात दुसऱ्या बाजूनेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी एजाज ईसाक फकीर (वय 40, रा. शेंडगे गल्ली, भुम) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गौस बाबु शेख, साहील गौस शेख, सोहेल गौस शेख, साकीब गौस शेख, जफर सिकंदर पठाण, रेहना समद शेख, तबसुम गौस शेख, हालीमा बाबु शेख व समीना सोहेल शेख (सर्व रा. भुम) यांनी इंस्टाग्राम स्टेटसच्या कारणावरून वाद घालत एकत्र येऊन शिवीगाळ केली. तसेच काठी, दगड व लोखंडी सळईने मारहाण करून एजाज फकीर व त्यांच्या नातेवाईकांना जखमी केले.
या तक्रारीवरूनही भुम पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 118(1), 189(2), 191(2), 190, 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे भुम शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील तपास सुरू केला असून दोन्ही गटांतील संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

0 Comments