रेड्यांच्या टकरीवरून रक्तरंजित वाद; १५ दिवसांच्या नवविवाहित तरुणाचा धारदार शस्त्राने खून, जालन्यात खळबळ
जालना प्रतिनिधी :
जालना शहरात एका क्षुल्लक कारणावरून उफाळलेल्या वादाने भीषण स्वरूप धारण करत एका नवविवाहित तरुणाचा जीव घेतला. रेड्यांच्या टकरीवरून सुरू झालेला वाद दोन गटांमध्ये पेटला आणि त्याचे रुपांतर थेट खुनात झाले. या घटनेमुळे संपूर्ण जालना शहरात खळबळ उडाली आहे.
शहरातील मोतीबाग परिसरात दि. २२ रोजी सायंकाळच्या सुमारास रेड्यांच्या टकरीदरम्यान दोन गट आमनेसामने आले. सुरुवातीला किरकोळ वाद झाला; मात्र काही वेळातच हा वाद शिवीगाळ आणि नंतर मारहाणीत परिवर्तित झाला.
या घटनेत रवींद्र अशोक लाड (वय २८ वर्ष) या तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. तसेच लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात प्रेम लाड (वय २०) आणि नरेश अवघड (वय २०) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
वाद मिटवण्याच्या बहाण्याने हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र लाड, प्रेम लाड आणि नरेश अवघड यांचा सोमनाथ लाड याच्यासोबत रेड्यांच्या टकरीवरून वाद झाला होता. हा वाद मिटवण्याच्या बहाण्याने आरोपींनी तिघांना मोतीबाग परिसरात बोलावले. मात्र तेथे त्यांच्यावर अचानक तलवार आणि चाकूने हल्ला करत लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली.
संसार सुरू होण्याआधीच अंत
या घटनेतील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे मृत रवींद्र लाड याचा विवाह अवघ्या १५ दिवसांपूर्वीच झाला होता. नव्या आयुष्याची सुरुवात करण्याआधीच त्याच्यावर काळाने झडप घातली. पत्नीसोबत देवदर्शन करून नुकताच तो जालन्यात परतला होता. घरात आनंदाचे वातावरण असताना अचानक या घटनेने लाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आरोपी २४ तासांत पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणी पोलिसांनी जलद कारवाई करत संतोष श्रीचंद लाड, सुरज दादाराव लाड आणि सोमनाथ अशोक लाड यांना ताब्यात घेतले असून अटक प्रक्रिया सुरू आहे. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आणखी संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव आणि त्यांच्या पथकाने केली.
परिसरात तणावपूर्ण शांतता
या घटनेनंतर जालना शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या या खुनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
रेड्यांच्या टकरीसारख्या किरकोळ कारणावरून एका तरुणाचा जीव जाणे ही अत्यंत दुर्दैवी घटना असून समाजात वाढत्या हिंसाचाराचे चिंताजनक चित्र पुन्हा समोर आले आहे.

0 Comments