चोराखळी येथील कालिका सांस्कृतिक कलाकेंद्रात पहाटेचा थरारक दरोडा; पिस्तूल–सुरा दाखवत ९.५१ लाखांचा ऐवज लंपास-Kalika kala kendra Chorakhali Robbery News

Hot Posts

6/recent/ticker-posts

चोराखळी येथील कालिका सांस्कृतिक कलाकेंद्रात पहाटेचा थरारक दरोडा; पिस्तूल–सुरा दाखवत ९.५१ लाखांचा ऐवज लंपास-Kalika kala kendra Chorakhali Robbery News

चोराखळी येथील कालिका सांस्कृतिक कलाकेंद्रात पहाटेचा थरारक दरोडा; पिस्तूल–सुरा दाखवत ९.५१ लाखांचा ऐवज लंपास-Kalika kala kendra Chorakhali Robbery News


 धाराशिव  – कळंब तालुक्यातील चोराखळी येथील कालिका सांस्कृतिक लोकनाट्य कलाकेंद्राच्या संचालिकेच्या घरी सहा जणांनी पहाटेच्या सुमारास घुसखोरी करून पिस्तूल व लोखंडी सुरा दाखवत तब्बल ९ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी येरमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

कला केंद्रातील घरात दरोडेखोरांचा पहाटेचा थरार

चोराखळी येथील रहिवासी व कालिका सांस्कृतिक लोकनाट्य कलाकेंद्राच्या संचालिका निर्मला मोहन जाधव (वय ४५) या धाराशिव साखर कारखान्याजवळ, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ लगत असलेल्या त्यांच्या कलाकेंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर कुटुंबासह राहत आहेत. त्यांच्या सोबत लहानपणापासूनची मैत्रीण रेखा किशोर शिंदे (रा. टाकळी, जि. परभणी), शिवम उर्फ गळ्या गंगावणे तसेच चालक शशिकांत मुंडे हेही वास्तव्यास होते.

रविवारी (ता. २) पहाटे साडेतीनच्या सुमारास बार्शी (जि. सोलापूर) येथील कलाकेंद्र बंद करून सर्वजण इनोव्हा गाडीने चोराखळी येथे परतत होते. त्यावेळी एका चारचाकी वाहनाने पाठलाग केल्याचे त्यांना जाणवले. पहाटे साडेपाचच्या सुमारास ते घरी पोहोचले असता, तोंडाला अर्धवट कापड बांधलेले सहा इसम घरात घुसले.

पिस्तूल–सुराचा धाक; डोळ्यांत चटणी टाकून धमकी

घरात शिरताच दोन आरोपींनी शिवम गंगावणे याला जमिनीवर दाबून धरले. एका आरोपीने निर्मला जाधव यांच्या डोक्याला पिस्तूल लावले, तर दुसऱ्याने रेखा शिंदे यांच्या गळ्याला लोखंडी सुरा लावला. आरडाओरड सुरू होताच आरोपींनी तिघांच्या डोळ्यांत चटणी टाकून जीवे मारण्याची धमकी दिली.

९.५१ लाखांचा ऐवज लंपास

आरोपींनी निर्मला जाधव यांच्या अंगावरील सुमारे १२१.६०० ग्रॅम वजनाचे अंदाजे ६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, चार मोबाईल फोन (किंमत सुमारे ३ लाख ४९ हजार रुपये) तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण ९ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

ओळखीच्या आरोपीवर संशय

तक्रारीनुसार, मागील काही महिन्यांपासून तेरखेडा येथील सचिन उर्फ प्रशांत बापू पवार व महादेव विठ्ठल घुले यांची कलाकेंद्रावर ये-जा होती. आर्थिक व्यवहारातून वाद झाल्यानंतर सचिन पवार याने घरफोडीची धमकी दिल्याचे नमूद आहे. दरोड्यावेळी समोर उभा असलेला एक आरोपी सचिन उर्फ प्रशांत पवार असल्याचे ओळखूनही जीवाला धोका असल्याने त्यांनी तात्काळ ओळख उघड केली नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.

या दरोड्यात सचिन पवारसह पाच अज्ञात आरोपींचा तसेच महादेव घुले याचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिसांचा तपास सुरू

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने चोराखळीतील कलाकेंद्र सील झाल्यानंतर निर्मला जाधव यांनी बार्शी येथे भाड्याने दुसरे कलाकेंद्र सुरू केले होते. या पार्श्वभूमीवरही पोलिस विविध कोनातून तपास करत आहेत.

येरमाळा पोलीस स्टेशन चे अधिकारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीही करण्यात येत आहे. या घटनेचा अधिक तपास येरमाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्या भालेराव हे करत आहेत.

या घटनेमुळे चोराखळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून तातडीने आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे.


Post a Comment

0 Comments