धाराशिव येथे सुवर्णकार संघटनांचा सेमिनार; सदस्यतेचे लाभ व MSME विषयावर मार्गदर्शन-Tuljapur Live News Daily
धाराशिव / तुळजापूर :
सुवर्णकार व्यावसायिकांना संघटनात्मक बळ मिळावे तसेच उद्योग क्षेत्रातील विविध योजनांची माहिती मिळावी या उद्देशाने सुवर्णकार असोसिएशन फेडरेशन व सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव येथे सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सेमिनार शनिवार, दिनांक 14 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता धाराशिव येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात सुवर्णकार बांधवांसाठी सदस्यतेचे लाभ, उद्योगविकासाच्या संधी तसेच MSME (सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग) योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या सेमिनारसाठी GJEPC मुंबईच्या सौ. अर्चना भोसले तसेच MSME विभागाच्या सौ. अर्चना पांडे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्या सुवर्णकार व्यवसायाशी संबंधित शासकीय योजना, नोंदणी प्रक्रिया, उद्योगवृद्धीसाठी उपलब्ध आर्थिक व तांत्रिक सहाय्य याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान, कार्यक्रमासाठी धाराशिव येथे येण्यापूर्वी त्या तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी आल्या असता त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मधुकर शेळके, संस्थापक अध्यक्ष जिजामाता प्रतिष्ठान तसेच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तुळजापूर आणि जिल्हाध्यक्ष सराफ सुवर्णकार संरक्षण समिती यांनी त्यांचा देवी तुळजाभवानीची प्रतिमा देऊन सन्मान केला.
या प्रसंगी उपस्थितांनी सुवर्णकार समाजाच्या प्रगतीसाठी अशा मार्गदर्शनपर उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. तसेच धाराशिव येथे होणाऱ्या या सेमिनारला जिल्ह्यातील सुवर्णकार व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

0 Comments