धाराशिव पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा उद्या; उमेदवारांना सक्त सूचना, सकाळी ७ वाजता उपस्थित राहणे बंधनकारक-Police Bharati Dharashiv News
धाराशिव : महाराष्ट्र पोलीस अंतर्गत पोलीस शिपाई भरती 2024-2025 प्रक्रियेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील रिक्त 123 पोलीस शिपाई पदांसाठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
ही परीक्षा रामकृष्ण परमहंस महाविद्यालय (तांबरी विभाग) येथे होणार असून परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र महाआयटी विभागामार्फत पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
पोलीस शिपाई भरतीची ही परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी उमेदवारांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी मैदानी चाचणीचे प्रवेशपत्र आणि लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र ही दोन्ही कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक आहे. तसेच प्रवेशपत्रावर नमूद केलेले पासपोर्ट साईजचे दोन फोटो असणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे नसल्यास उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी सर्व उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्याच्या चार तास आधी म्हणजे सकाळी 7.00 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षेसाठी आवश्यक असलेले काळ्या शाईचे बॉलपेन पोलीस प्रशासनाकडूनच उपलब्ध करून दिले जाणार असल्याने उमेदवारांना पेन, पेन्सिल, खोडरबर, मनगटी घड्याळ किंवा इतर कोणतेही साहित्य आणण्यास मनाई करण्यात आली आहे.
परीक्षा प्रक्रियेवर कडक नजर ठेवण्यासाठी संपूर्ण केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे तसेच व्हिडिओ कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रात मोबाईल फोन, डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मायक्रो कॅमेरा, कॅल्क्युलेटर, डिजिटल नोटपॅड, नोट्स पुस्तके, ईअरफोन, हिअरिंग एड डिव्हाइस, स्मार्ट वॉच, स्मार्ट आय ग्लासेस यासारखी कोणतीही इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
जर कोणताही उमेदवार कॉपी करण्याचा प्रयत्न करताना अथवा कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करताना आढळून आला तर त्याला तात्काळ बाद करण्यात येईल. तसेच त्याच्यावर महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम 2024 अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, बाहेरगावाहून येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी 14 मार्च रोजी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी आर एस करिअर अकॅडमी आणि बटालियन अकॅडमी येथे उमेदवारांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाने सर्व उमेदवारांनी नियमांचे काटेकोर पालन करून परीक्षेस वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

0 Comments