सोलापूरमध्ये बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेत मोठा घोटाळा; ३.६२ कोटींचा अपहार, ३ अधिकारी निलंबित-Solapur scholarship scam, construction workers scholarship fraud
सोलापूर/प्रतिनिधी रूपेश डोलारे : इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या शिष्यवृत्ती योजनेत मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट शैक्षणिक कागदपत्रे व बोगस कामगार कार्ड तयार करून सोलापूर येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी आणि एजंटांनी मिळून तब्बल ३ कोटी ६२ लाख रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये संतोषसिंग राजपूत, उज्ज्वल सूर्यवंशी आणि अजिंक्य पवार यांचा समावेश आहे. तर आकाश कोळी, समीर पटेल, अन्नपूर्णा पंडकी, तब्बसुम यादगिरी, अर्जुन संगा, रविराज मुसळे, अंबादास बुगडे, भारत करंडे, सूरज मगर, रविकांत पाटील, शिवानंद सुरवसे, आशितोष कटारे, अर्चना पाटील, शीतल परदेशी, सौरभ हलके, बाळासाहेब शिंदे आणि चंदन दिघे यांच्यासह एकूण २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिष्यवृत्ती योजनेचा गैरवापर
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेअंतर्गत दरवर्षी प्रत्येक लाभार्थ्याला ६० हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन दिले जाते. सोलापूर जिल्ह्यात एक लाखांहून अधिक बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे.
मात्र काही कंत्राटी कर्मचारी आणि एजंटांनी संगनमत करून बनावट कामगार कार्ड तयार केली तसेच खोटी शैक्षणिक कागदपत्रे सादर करून विद्यार्थ्यांच्या नावावर शिष्यवृत्तीची रक्कम उचलली. त्यामुळे शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याचे समोर आले आहे.
२२३ लाभार्थ्यांची तक्रार
सुमारे सहा महिन्यांपूर्वी २२३ बांधकाम कामगारांनी तक्रार दाखल करत आपल्या मुलांच्या नावाने इतरांनी शिष्यवृत्तीची रक्कम उचलल्याचा आरोप केला होता. मात्र सुरुवातीला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचेही सांगितले जात आहे.
अपहाराची रक्कम वाढण्याची शक्यता
या प्रकरणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करत शासनाच्या ८ कोटी रुपयांहून अधिक निधीचा अपहार झाल्याचा मुद्दा मांडला आहे. तसेच सखोल चौकशी झाल्यास हा घोटाळा १०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सहायक कामगार आयुक्तांनी प्राथमिक चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. पुढील चौकशीत लाभार्थ्यांची यादी तसेच त्यांच्या मुलांनी ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतल्याचे दाखवले आहे, त्या संस्थांचीही पडताळणी करण्यात येणार आहे.
या प्रकरणामुळे बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दीड महिन्यापूर्वी येथील प्रभारीचा पदभार घेतला आहे. पदभार घेण्यापूर्वीच येथे अपहार झाला आहे. कार्यालयात दाखल झालेल्या तक्रारीवरून चौकशी केली. यात तीन कोटी 62 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आल्यानेच जबाबदार तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्याची सखोल चौकशी होईलच. कामगारांनी कोणत्याही कामासाठी कोणालाही पैसे देऊ नयेत. तसे कोणाबाबत घडल्यास कार्यालयात थेट तक्रार करावी.
-मंगेश झोले, सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर

0 Comments