पवनचक्कीवर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; ८ गुन्हे उघड, ₹४२ लाखांचा मुद्देमाल जप्त-Dharashiv Police
धाराशिव | प्रतिनिधी
पवनचक्की प्रकल्पांवर दरोडे टाकून तांब्याच्या तारा लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ₹४२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दरोडा व चोरीचे एकूण ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
दि. ०७ एप्रिल २०२६ रोजी बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरेगव्हाण शिवारात पवनचक्कीवरील दोन सुरक्षारक्षकांना दोरीने बांधून मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा व रोख रक्कम लंपास करण्यात आली होती. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९९/२०२६ नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी घडल्या होत्या.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार दि. १६ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ढोकी-कळंब रोडवरील गोविंदपूर पाटी येथे सापळा रचून ५ संशयितांना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपींकडून तांब्याच्या तारा, रोख रक्कम तसेच २ महिंद्रा स्कॉर्पिओ व १ बोलेरो अशी एकूण ₹४२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपींनी मेंढा, उमरेगव्हाण, चिकुंद्रा, गंधोरा, कन्हेरवाडी व वाशी परिसरात पवनचक्कीचे साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. तसेच सुरक्षारक्षकांना धमकावण्यासाठी मारहाण केल्याचेही त्यांनी सांगितले.
👤 अटक आरोपी:
- सुनिल कालिदार शिंदे (रा. ढोकी)
- लखन बापू पवार (रा. उपळा)
- सिद्राम पोपट पवार (रा. वरूडा)
- उद्धव बापू शिंदे (रा. बावी)
- विक्रम लक्ष्मण पवार (रा. खामकरवाडी)
या प्रकरणातील इतर काही साथीदार फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. अटक आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी बेंबळी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


0 Comments