२४ तासांत दरोडेखोरांचा पर्दाफाश; सशस्त्र टोळी जेरबंद, सोन्याचे दागिने व मोटारसायकली जप्त-Dharashiv Police

Hot Posts

6/recent/ticker-posts

२४ तासांत दरोडेखोरांचा पर्दाफाश; सशस्त्र टोळी जेरबंद, सोन्याचे दागिने व मोटारसायकली जप्त-Dharashiv Police

२४ तासांत दरोडेखोरांचा पर्दाफाश; सशस्त्र टोळी जेरबंद, सोन्याचे दागिने व मोटारसायकली जप्त धाराशिव  स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी -Dharashiv  Police


 

धाराशिव, दि. २६ (प्रतिनिधी) : परंडा तालुक्यातील मौजे कुंभेज येथे माजी सैनिकाच्या शेतवस्तीवरील घरावर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या कुख्यात टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत पर्दाफाश करत सात आरोपींना जेरबंद केले. या धडक कारवाईत सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकली असा सुमारे १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास माजी सैनिक विश्वनाथ मुरलीधर जगताप हे आपल्या पत्नीसमवेत घरासमोर झोपलेले असताना अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या घरावर अचानक हल्ला चढवला. आरोपींनी जगताप यांच्यावर चाकूने प्राणघातक वार करत त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

घटना अंधारात घडली असून परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याने आरोपींचा माग काढणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. मात्र पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना आणि भुम विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी डोकेवाडी शिवारात सापळा रचून आरोपींना वेढा घालत शिताफीने अटक केली. अटकेत घेतलेल्या आरोपींमध्ये किरण पंडित शिंदे, राघवा निवांत्या शिंदे, ज्ञानेश्वर लिग्या काळे, विकास नागेश भोसले, सुनील प्रकाश भोसले, चेतन किरण शिंदे आणि सुनील चरण शिंदे यांचा समावेश आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगाने व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments