धक्कादायक फसवणूक : ‘मराठा म्हणून लग्न केलं पण निघाली मुस्लिम, लातूरच्या नवरीने मंगळवेढ्याच्या शेतकरी नवऱ्याला फसवलं–नववधु पळून जाण्याच्या प्रयत्नातून भांडाफोड-Mangalveda Fraud Marriage Complaint
सोलापूर, प्रतिनिधी : लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या एका तरुणाची अत्यंत चलाखीने फसवणूक केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यात उघडकीस आली आहे. अविवाहित असल्याचे भासवून प्रत्यक्षात विवाहित महिलेशी लग्न लावून देत तब्बल 2 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. विशेष म्हणजे, लग्नानंतर काही दिवसांतच नववधू पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना हा संपूर्ण बनाव उघड झाला.
फिर्यादीनुसार घडलेली घटना :
या प्रकरणी फिर्यादी विनायक भीमराव अवताडे (रा. लेंडवे चिंचाळे, ता. मंगळवेढा) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार सुरेखा सूर्यवंशी (रा. उदगीर) आणि कुसुमबेन उर्फ कुसुम बेमाबाई घाटाड (रा. गुजरात) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीचे लग्न जमत नसल्याने नातेवाईकांच्या माध्यमातून सुरेखा सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. 16 एप्रिल रोजी उदगीर येथे भेट झाली. त्यावेळी “कुसुम” नावाची मुलगी मराठा समाजातील अविवाहित असून लग्नासाठी तयार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी 2 लाख 70 हजार रुपयांची मागणी करण्यात आली.
विश्वास ठेवून फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी रोख आणि ऑनलाईन व्यवहाराद्वारे ही रक्कम दिली. त्याच दिवशी रात्री उशिरा लातूर येथील गणपती मंदिरात साध्या पद्धतीने विवाह लावण्यात आला. त्यानंतर नववधूला गावात आणून पारंपरिक पद्धतीने पुन्हा विवाह सोहळा करण्यात आला.
पळून जाण्याच्या प्रयत्नातून उघडकीस आली सत्यस्थिती :
लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत चालू असल्याचे भासवण्यात आले. मात्र 23 एप्रिल रोजी पहाटे नववधू घरामागे आलेल्या कारमध्ये बसून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले.
गावकऱ्यांनी तत्काळ पाठलाग करत मंगळवेढा जवळील अवताडे पेट्रोल पंप परिसरात गाडी अडवली. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली— संबंधित महिला विवाहित असून तिला मुलेही असल्याचे उघड झाले. तिचे खरे नाव कुसुम बेमाबाई घाटाड असल्याचे निष्पन्न झाले.
गुन्हा दाखल, तपास सुरू :
यानंतर सर्व संबंधितांना मंगळवेढा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 318(4) व 3(5) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोरी गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
मराठा मुलगी म्हणून फसवणूक
लग्न लावण्यापूर्वी नववधू असणारी मुलगी मराठा समाजाची आहे असेही सांगितले. लग्न झाले. मात्र लग्न झाल्यानंतर अवघ्या चार दिवसात या मुलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी नवी नवरी पूर्वीच विवाहित असल्याचे उघडकीस आले. तिला मुलेही आहेत. महत्त्वाचे म्हणजे मराठा समाजाची नववधू आहे असे भासवलेले ही नवरी मुस्लिम धर्मीय असल्याची माहिती पुढे आली. याबाबत नवऱ्याने पाठलाग करून नवरीला पकडले. आणि यानंतर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या मुलाची फसवणूक केलेली नवरी आणि एजंट मंगळवेढा पोलिसांच्या ताब्यात आहेत. वय झाल्याने ज्यांचे लग्न जमत नाही, अशा मुलांना गाठायचे… त्यांच्याशी लग्न करायचे आणि दागिने, रोख रक्कम व किमती वस्तू घेऊन पोबारा करायचा.. अशा 'डॉली की डोली' या टोळी सध्या सक्रिय आहे.

0 Comments