धाराशिव : गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्यांवर एलसीबीची धडक कारवाई; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त
धाराशिव : गोवंशीय जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक करून कत्तलीसाठी नेणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे शाखा धाराशिवने धडक कारवाई करत सहा गोवंशीय जनावरे आणि पिकअप वाहनासह तब्बल 11 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी पहाटे धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार हे आपल्या पथकासह दि. 25 मे 2026 रोजी पहाटे 1.30 वाजण्याच्या सुमारास धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी येरमाळा ते धाराशिव मार्गावरून एका वाहनातून गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित वाहनास थांबण्याचा इशारा केला. चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अत्यंत दाटीवाटीने गोवंशीय जनावरे भरलेली असल्याचे आढळून आले. जनावरे कुठून आणली व कशासाठी नेली जात आहेत, याबाबत चालकाकडे चौकशी करण्यात आली. मात्र त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही.
त्यानंतर सदरील वाहन धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दोन पंचांच्या उपस्थितीत वाहनाची सविस्तर तपासणी केली असता वाहनामध्ये सहा गोवंशीय जनावरे आढळून आली. तसेच पिकअप वाहनासह एकूण 11 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांच्या तपासात जनावरांना वाहनामध्ये अत्यंत अमानुष व त्रासदायक पद्धतीने कोंबून वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. जनावरांना हालचालीसाठी पुरेशी जागा नसल्याने त्यांचा छळ होत असल्याचे आढळले.
याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक 123/2026 अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1)(क), (घ), (ड) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार 1250 भांगे हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, पोलीस हवालदार दत्तात्रय राठोड, समाधान वाघमारे, दयानंद गादेकर, पोलीस नाईक अशोक ढगारे तसेच पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने केली.

0 Comments