कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची वाहतूक उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, ११.३० लाखांचा मुद्देमाल जप्त-Dharashiv Crime News Daily
धाराशिव : कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत अमानुष पद्धतीने गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांनी मोठी कारवाई करत सहा गोवंशीय जनावरे व पिकअप वाहनासह तब्बल ११ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई २५ मे २०२६ रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार हे आपल्या पथकासह येरमाळा ते धाराशिव मार्गावर पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, एका वाहनातून गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक केली जात आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित वाहनाला थांबण्याचा इशारा केला. चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अत्यंत दाटीवाटीने गोवंशीय जनावरे कोंबून भरलेली असल्याचे आढळून आले. जनावरांना हालचाल करण्यासाठी पुरेशी जागा नव्हती तसेच त्यांची वाहतूक अत्यंत त्रासदायक आणि अमानुष पद्धतीने केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी चालकाकडे जनावरे कुठून आणली व कोणत्या कारणासाठी वाहतूक केली जात आहे याबाबत चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही.
यानंतर संबंधित वाहन धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून दोन पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. तपासणीत वाहनामध्ये सहा गोवंशीय जनावरे आढळून आली. या जनावरांसह पिकअप वाहन असा एकूण ११ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १२३/२०२६ अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(क), (घ), (ड) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार १२५० भांगे हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, पोलीस हवालदार दत्तात्रय राठोड, समाधान वाघमारे, दयानंद गादेकर, पोलीस नाईक अशोक ढगारे तसेच पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

0 Comments