धाराशिव बसस्थानकातून मोटारसायकली चोरणाऱ्या दोघांना एलसीबीने ठोकल्या बेड्या
चार चोरीच्या दुचाकींसह दोन आरोपी जेरबंद; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त
धाराशिव : धाराशिव शहर बसस्थानक परिसरातून मोटारसायकली चोरी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून त्यांच्या ताब्यातून चार चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे शहरातील वाहनचोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि. २२ मे २०२६ रोजी मालमत्तेविषयक गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेत सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आले होते. यावेळी पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक विश्लेषणातून माहिती मिळाली की, अंबालना हॉटेलसमोरील चौकात दोन इसम चोरीच्या मोटारसायकलींसह थांबले आहेत. माहिती खात्रीशीर असल्याने पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी आपली नावे राजेश उर्फ राजा परमेश्वर बनसोडे (वय २१, रा. साठे नगर, धाराशिव) आणि अतिष हनुमंत सगर (वय २२, रा. भक्ती मार्ग, सांगोला चौक झोपडपट्टी, पंढरपूर, जि. सोलापूर, सध्या रा. गावसूद, धाराशिव) अशी सांगितली. पथकाने त्यांच्या ताब्यातील मोटारसायकलींबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्या चोरी केल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून अंदाजे ६० हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या. पुढील कारवाईसाठी आरोपींसह जप्त मोटारसायकली आनंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार सपोनि अमोल मोरे, पोहेकॉ बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, राहुल नाईकवाडी, चालक पोलीस अंमलदार दहीहंडे तसेच पोलीस अंमलदार बिराजदार यांच्या पथकाने केली.

0 Comments