बीसीच्या पैशाच्या वादातून निर्घृण खून; लोखंडी रॉड व मोटारसायकलच्या चेनने मारहाण करून एकाचा जीव घेतला-Dharashiv Crime News Murder
धाराशिव प्रतिनिधी : बीसीच्या पैशांच्या देण्या-घेण्याच्या वादातून एका ५५ वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना परंडा तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथे घडली. या प्रकरणी आंबी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव कृष्णा शिवणकर (वय ५५, रा. चिंचपूर खुर्द, ता. परंडा, जि. धाराशिव) यांचा बीसीच्या पैशांच्या देण्या-घेण्यावरून वाद सुरू होता. याच कारणातून विक्रम बाबुराव गरड व दीपक विक्रम गरड (दोघे रा. चिंचपूर खुर्द, ता. परंडा) यांनी २८ मे २०२६ रोजी दुपारी ३ ते ४.३० वाजण्याच्या सुमारास चिंचपूर खुर्द गावात तसेच चिंचपूर ते रत्नापूर रस्त्यावर महादेव शिवणकर यांना गाठले.
आरोपींनी लोखंडी रॉड आणि मोटारसायकलची चेन वापरून त्यांच्यावर बेछूट हल्ला केला. या मारहाणीत महादेव शिवणकर गंभीर जखमी झाले. झालेल्या मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी मयताचे नातेवाईक अशोक गुरुदास शिवणकर यांनी आंबी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी विक्रम बाबुराव गरड व दीपक विक्रम गरड यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) व 3(5) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचा अधिक तपास आंबी पोलीस करीत आहेत. या खून प्रकरणामुळे परंडा तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

0 Comments