चाकूचा धाक दाखवून महिलेची सोनसाखळी लुटली; तुळजापूर तालुक्यातील धनेगावच्या तिघांविरुद्ध गुन्हा-Tuljapur Crime News Live
तुळजापूर, दि. १ जून – शेतातून घरी परतणाऱ्या एका महिलेस चाकूचा धाक दाखवून तिच्या अंगावरील सुमारे २० ग्रॅम सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील खोताची वाडी परिसरात घडली. या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राधा भरत क्षिरसागर (वय ४९, रा. खोताची वाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) या दि. २६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास शेतातून एकट्याच घरी जात होत्या. त्यावेळी खोताची वाडी येथील गैबीसाहेब दर्ग्याजवळ मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडविले.
आरोपींनी चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण तसेच ५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाळ्या जबरदस्तीने काढून घेतल्या. दागिने हिसकावून घेतल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी राहुल सुनिल भोसले, सुनिल हुलप्पा भोसले आणि विशाल भागवत शिंदे (सर्व रा. धनेगाव, ता. तुळजापूर) यांच्याविरुद्ध राधा क्षिरसागर यांनी दि. ३० मे २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला असून पुढील तपास तुळजापूर पोलिस करत आहेत.
बसमध्ये चढताना सोन्याची चैन लंपास
दुसऱ्या घटनेत मुंबई येथील रहिवासी शंकर गोविंद कदम (वय 55) हे 31 मे 2026 रोजी सकाळी तुळजापूरच्या जुन्या बसस्थानकावरून तुळजापूर-मालवण बसमध्ये चढत होते. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाची, अंदाजे 30 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन चोरून नेली.
ही बाब लक्षात आल्यानंतर शंकर कदम यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

0 Comments