धाराशिव: पेट्रोलच्या महागाईत सासऱ्याकडून जावयाला सिंधी घोडीची भेट; धाराशिवमध्ये ‘धोंडा’ जेवणाची अनोखी चर्चांना उधाण -Dharashiv News
धाराशिव : राज्यभरात अधिक मास अर्थात ‘धोंड्याच्या महिन्या’चा उत्साह सध्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. या महिन्यात जावयाला सासरवाडीकडून विशेष मानपान देण्याची परंपरा आहे. जावयाला सासरी बोलावून खास भोजन दिले जाते, औक्षण केले जाते आणि त्यानंतर भेटवस्तू देऊन सन्मान केला जातो. मात्र धाराशिव जिल्ह्यात एका सासऱ्याने आपल्या जावयाला अशी भेट दिली आहे की, तिची पंचक्रोशीत जोरदार चर्चा रंगली आहे.
महागाई आणि वाढत्या पेट्रोल-डिझेल दरांच्या काळात धाराशिवमधील एका सासऱ्याने आपल्या जावयाला थेट सिंधी जातीची घोडी भेट दिली आहे. पारंपरिक धोंडे जेवणाच्या कार्यक्रमात ही आगळीवेगळी भेट देण्यात आल्याने उपस्थित नागरिक आश्चर्यचकित झाले. “पेट्रोलपेक्षा घोडीच परवडली”, अशा मिश्किल प्रतिक्रिया देखील नागरिकांमधून उमटताना दिसत आहेत.
ईट येथील वकील क्रांतिसिंह राऊत यांचा विवाह कोरोनापूर्वी पारा येथील विलासराव झांबरे यांच्या मुलीसोबत झाला होता. दरम्यान, कोरोना काळात आलेल्या अधिक मासात सासरकडून पारंपरिक हौसमौज करता आली नव्हती. त्यामुळे यंदाच्या अधिक मासात जावयाचा खास सन्मान करण्याचा निर्णय सासरे विलासराव झांबरे यांनी घेतला.
क्रांतिसिंह राऊत यांना घोड्यांची विशेष आवड असल्याची माहिती सासऱ्यांना होती. त्यानुसार त्यांनी केज तालुक्यातील साळेगाव येथील सलमान खान यांच्या माध्यमातून सिंधी जातीची घोडी आणली. धोंडे जेवणाचा कार्यक्रम पार पडल्यावर ही घोडी जावई क्रांतिसिंह राऊत यांना भेट स्वरूपात देण्यात आली.
ही भेट पाहून उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले. सासऱ्याने जावयाची हौस पूर्ण करण्यासाठी दिलेली ही अनोखी भेट परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे, क्रांतिसिंह राऊत हे आता या घोडीवर बसून शेतात जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी शेती असल्यामुळे घोडीचा उपयोग त्यांना दैनंदिन कामासाठीही होत आहे.
वाढत्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरांमुळे सामान्य नागरिक त्रस्त असताना, घोडीला इंधन लागत नसल्याने “हा व्यवहार फायदेशीरच” असल्याच्या गंमतीशीर चर्चाही रंगत आहेत. घोडीला फक्त चारा लागतो आणि त्यामुळे खर्च कमी असल्याचे बोलले जात आहे.
सासऱ्याकडून जावयाला देण्यात आलेल्या या अनोख्या भेटीची चर्चा सध्या संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात रंगली असून, ही घोडी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे.

0 Comments