उमरगा-चिवरी लघु पाटबंधारे तलावातील 84 हजारांची वीज वायर चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल-Umerga Chivari Live Update
तुळजापुर /प्रतिनिधी : तुळजापूर तालुक्यातील उमरगा-चिवरी येथील लघु पाटबंधारे तलाव परिसरातून तब्बल 84 हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिक वायर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळू जगन्नाथ वडजे (वय 64, रा. उमरगा-चिवरी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, दि. 5 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते 6 जून रोजी सकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने उमरगा-चिवरी येथील लघु पाटबंधारे तलाव परिसरातील इलेक्ट्रिक वायर चोरी केली.
चोरीस गेलेल्या मालामध्ये फिर्यादी बाळू वडजे तसेच अण्णाराव कदम, बाबासाहेब शिरगिरे, शिवाजी भोसले आणि अब्दुल इनामदार यांच्या मालकीची एकूण 4 हजार 200 फूट लांबीची इलेक्ट्रिक वायर होती. या वायरची एकूण किंमत सुमारे 84 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच फिर्यादी बाळू वडजे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या प्रथम खबर अहवालावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अन्वये चोरीचा गुन्हा नोंदविला आहे.

0 Comments