उमरगा : चव्हाण परिवाराचा राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत 'हॅट्रिक विजय'; कुटुंबातील तिघांनाही पारितोषिके

Hot Posts

6/recent/ticker-posts

उमरगा : चव्हाण परिवाराचा राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत 'हॅट्रिक विजय'; कुटुंबातील तिघांनाही पारितोषिके

उमरगा : चव्हाण परिवाराचा राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत 'हॅट्रिक विजय'; कुटुंबातील तिघांनाही पारितोषिके


उमरगा (प्रतिनिधी):पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात आयोजित अखिल भारतीय सांस्कृतिक संघ (ABSS) यांच्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत उमरगा येथील चव्हाण परिवाराने उल्लेखनीय कामगिरी करत कुटुंबातील तिन्ही सदस्यांनी पारितोषिके पटकावण्याचा मान मिळविला आहे. एकाच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत कुटुंबातील तिघांनाही सन्मान मिळाल्याने चव्हाण परिवाराच्या या यशाची परिसरात चर्चा होत आहे.

दि. 21 मे ते 1 जून 2026 या कालावधीत सलग दहा दिवस चाललेल्या या भव्य राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील कलाकारांनी सहभाग घेतला. विविध नृत्य प्रकारांतील सुमारे 1750 सादरीकरणे या स्पर्धेत झाली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण दि. 1 जून 2026 रोजी त्याच सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

या स्पर्धेत ऍड. शीतल शामराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या पारंपरिक लोकसंस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोंधळी गीतावर नृत्य सादर केले. वकीली, सामाजिक कार्य, लेखन, वाचन चळवळ आणि जनजागृती उपक्रमांमधून ओळख असलेल्या ऍड. चव्हाण यांनी लोककलेप्रती असलेली आपली जिव्हाळ्याची भावना या सादरीकरणातून व्यक्त केली. त्यांच्या या सादरीकरणाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.


त्यांची कन्या कु. स्वरा शीतल चव्हाण हिने मराठी रॅप आणि बॉलिवूड हिपहॉप या आधुनिक शैलीतील नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तिच्या आत्मविश्वासपूर्ण आणि उत्स्फूर्त सादरीकरणाची दखल घेत तिला स्पर्धेतील विशेष 'चेअरमन अवार्ड' देऊन गौरविण्यात आले.

तसेच पुत्र शंभूराजे शीतल चव्हाण याने समूह नृत्य (बॉलिवूड प्रकार) या विभागात सहभाग नोंदविला. त्याच्या संघाच्या उत्कृष्ट सादरीकरणाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. त्यामुळे चव्हाण परिवारातील तिन्ही सदस्यांनी राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत पुरस्कार मिळवत एकप्रकारे 'हॅट्रिक विजय' नोंदविला.

स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव ABSS च्या पदाधिकारी श्रीमती रत्ना वाघ, श्री. हेमंत वाघ तसेच प्रसिद्ध कथक नृत्यांगना रिचा गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला.

विशेष म्हणजे, चव्हाण परिवाराच्या या यशामध्ये परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम दिसून आला. एका बाजूला महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे गोंधळी नृत्य, तर दुसऱ्या बाजूला नव्या पिढीचे मराठी रॅप, हिपहॉप आणि बॉलिवूड शैलीतील सादरीकरण अशा विविध कलाप्रकारांतून कुटुंबातील सदस्यांनी आपली कला सादर केली.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत मिळालेल्या या यशाबद्दल चव्हाण परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, उमरगा-लोहारा परिसरातील कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी त्यांच्या या यशाचे स्वागत केले आहे.

"कला ही केवळ स्पर्धा जिंकण्याचे माध्यम नसून व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास आणि संस्कृतीशी नाते जपण्याचा मार्ग आहे," अशी भावना यावेळी चव्हाण परिवाराकडून व्यक्त करण्यात आली.



Post a Comment

0 Comments