सेवा सहयोग संस्था पुणे यांच्या माध्यमातून न्यू इंग्लिश स्कूल पिंपळखुंटे येथे १८० विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅगचे वाटप
पिंपळखुंटे (ता. माढा) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सेवा सहयोग संस्था, पुणे यांच्या सहकार्याने न्यू इंग्लिश स्कूल, पिंपळखुंटे येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मोफत शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत गरीब व गरजू कुटुंबातील १८० विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग देण्यात आल्या.
या उपक्रमासाठी पिंपळखुंटे गावचे सुपुत्र तसेच पुणे येथील गरवारे कॉलेजचे आदर्श शिक्षक मा. प्रविणकुमार बाबासाहेब अरनाळे यांनी सेवा सहयोग संस्था, पुणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांसाठी साहित्य उपलब्ध करून दिले.
कार्यक्रमात पिंपळखुंटे येथील नेते मा. पवनराजे पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत शिक्षणाबद्दलचा आत्मविश्वास वाढविण्याचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय दप्तरासह आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा मिळाव्यात, त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सक्षम व्हावा आणि आर्थिक अडचणीमुळे शिक्षणात खंड पडू नये हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक नलवडे सर, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सेवा सहयोग संस्था, पुणे तसेच या उपक्रमासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रविणकुमार अरनाळे यांचे विशेष आभार मानले.
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेला हा उपक्रम प्रेरणादायी ठरत असून, अशा उपक्रमांमुळे शिक्षण क्षेत्राला मोठी चालना मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



0 Comments