Breaking News- स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई : चार महिन्यांपूर्वी चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त; चोरटा ताब्यात
धाराशिव, दि. ५ जून – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या प्रभावी कारवाईत चोरीची मोटारसायकल ताब्यात बाळगणाऱ्या एका आरोपीस अटक करून त्याच्याकडून सुमारे २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त केली आहे. ही कारवाई धाराशिव शहरातील आठवडी बाजार परिसरात करण्यात आली.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ४ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक विविध गुन्ह्यांतील आरोपींची माहिती संकलित करत पेट्रोलिंग करीत असताना धाराशिव शहर हद्दीत दाखल झाले. त्यावेळी गोपनीय बातमीदारामार्फत एका इसमाकडे चोरीची मोटारसायकल असल्याची आणि तो आठवडी बाजार परिसरात थांबलेला असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव अशिष उर्फ संतोष शंकर पारेकर असे सांगितले. त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलीबाबत विचारणा केली असता, सदर मोटारसायकल चार महिन्यांपूर्वी धाराशिव शहरातील समर्थनगर परिसरातून चोरी केल्याची कबुली त्याने दिली.
यानंतर पोलिसांनी आरोपीकडून अंदाजे २० हजार रुपये किमतीची चोरीची मोटारसायकल जप्त केली. आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी चोरीच्या मोटारसायकलीसह आनंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोहेकॉ बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, राहुल नाईकवाडी, महिला पोलीस हवालदार शोभा बांगर तसेच चालक पोलीस अंमलदार दहीहंडे यांनी सहभाग घेतला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे वाहनचोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार असून चोरीस गेलेल्या वाहनांच्या शोधासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

0 Comments