पीव्हीसी पाईप कारखान्याला आग लावून नुकसान तरूणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला , तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा- धाराशिव जिल्ह्यातील घटना
मारहाण, खुनाचा प्रयत्न आणि मालमत्तेची जाळपोळ; भूम पोलिसांत गुन्हा दाखल
धाराशिव : भूम तालुक्यातील आरसोली येथील एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची तसेच पीव्हीसी पाईप कारखान्यात आग लावून नुकसान केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भूम पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मारहाण आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीराम उर्फ गोलू दशरथ साठे आणि अमिर अन्वर शेख (दोघे रा. आरसोली, ता. भूम) यांनी 2 जून 2026 रोजी रात्री 9.30 ते 10 वाजण्याच्या सुमारास भूम-परंडा रोडलगत असलेल्या प्रतिक पेट्रोलपंप परिसरात फिर्यादी महादेव चंद्रकांत मुंडेकर (वय 22, रा. आरसोली) यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी तसेच कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे.
याच रात्री सुमारे 12.45 ते पहाटे 2 वाजण्याच्या दरम्यान पार्डी रोडलगत असलेल्या सुरज शिंदे यांच्या पीव्हीसी पाईप कारखान्यात आरोपींनी प्रवेश करून मशीनवर ज्वलनशील पदार्थ टाकत आग लावली. या आगीत कारखान्यातील साहित्य आणि यंत्रसामग्रीचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच आयटीआय कॉलेजसमोरील हॉटेल अभिषेक परिसर आणि शासकीय विश्रामगृहासमोरील भागातही आरोपींकडून दहशत निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महादेव मुंडेकर यांनी 3 जून 2026 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109(2), 118(2), 352, 326(फ), 324, 3(5) तसेच सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंधक अधिनियमातील कलम 3 व 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास भूम पोलीस करीत असून आरोपींचा शोध घेण्यासह आगजनीमुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे भूम शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

0 Comments