चिवरी येथे फार्महाऊसवर घुसून मारहाण, धमक्या; आठ जणांविरुद्ध नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल -Naldurg Police Station Crime News
धाराशिव (प्रतिनिधी) – तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील एका फार्महाऊसवर जाऊन फिर्यादीस शिवीगाळ, मारहाण व धमकावल्याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कचरू मल्हारी सगट (वय 40, रा. काटगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आला. फिर्यादीनुसार, दि. 3 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास चिवरी येथील अनिल गायकवाड यांच्या फार्महाऊसवर आरोपींनी जाऊन गोंधळ घालत फिर्यादीस दमदाटी केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात सुनिल नामदेव बनसोडे (रा. काटी, ता. तुळजापूर), विनोद फरीद जाधव (रा. तिर्थ, ता. तुळजापूर), प्रमोद गायकवाड, योगेश दुरुगकर (दोघे रा. नळदुर्ग), अजय दुपारगुडे (रा. निलेगाव, ता. तुळजापूर) तसेच इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी एकत्र येऊन बेकायदेशीरपणे जमाव करून फिर्यादीला धमकावणे, शिवीगाळ करणे व मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर कचरू सगट यांनी दि. 4 जून 2026 रोजी नळदुर्ग पोलिस ठाण्यात प्रथम खबर दिली.
त्यावरून नळदुर्ग पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 189, 190, 191(2), 126(2), 127(2), 352 आणि 351(2) अन्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.

0 Comments