कौटुंबिक वादातून जावयाने घातला सासुच्या डोक्यात धोंडा ;सासु गंभीर जखमी, धाराशिव जिल्ह्यातील घटना-Dharashiv District Incident Crime News
धाराशिव | प्रतिनिधी : लोहारा तालुक्यातील मुर्शदपुर येथे कौटुंबिक वादातून सासूवर जावयाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन अशोक सुरवसे (रा. मुर्शदपुर, ता. लोहारा, जि. धाराशिव) यांनी दि. 09 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 3.00 वाजण्याच्या सुमारास मुर्शदपुर येथे फिर्यादी सुनिता मारुती खरोसे (वय 50, रा. मुर्शदपुर) यांच्या घरी जाऊन वाद घातला.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी हा नात्याने जावई असून त्याने, “माझा संसार का मोडलास, माझी बायको कोठे आहे, तू मेल्याशिवाय माझी बायको मला मिळत नाही,” असे म्हणत संतापाच्या भरात सासूवर हल्ला केला. त्यानंतर आरोपीने दगडाने त्यांच्या डोक्यात मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
घटनेनंतर जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर दि. 10 जून 2026 रोजी सुनिता खरोसे यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबाच्या आधारे लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी भा.न्या.सं. कलम 109(1), 115(2), 351(2), 351(3) अन्वये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.
कौटुंबिक वादातून हिंसक स्वरूप धारण झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

0 Comments