चिवरी येथे वादळी पावसाने नुकसान झालेल्या शिंदे कुटुंबाला मदतीचा हात; डॉ. जितेंद्र कानडे यांची भेट, महसूल प्रशासनाकडून पंचनामा-Chivari Live Update News
चिवरी, प्रतिनिधी :तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरात शनिवारी (दि. ६) दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिला. या अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे परिसरातील अनेकांचे नुकसान झाले असून, चिवरी येथील शेतकरी अण्णासाहेब शिंदे यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्याच्या जोरदार झोतामुळे शिंदे यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने त्यांचा संपूर्ण संसार अक्षरशः उघड्यावर आला. त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे घरामध्ये पाणी शिरून संसारोपयोगी साहित्य, धान्य तसेच इतर घरगुती वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे, शिंदे यांच्या मुलाचा अवघ्या मागील महिनाभरापूर्वी विवाह झाला होता. नववधूसाठी आणलेले संसारोपयोगी साहित्य, फर्निचर आणि अन्य वस्तू पावसात भिजून खराब झाल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अणदुर जिल्हा परिषद गटाचे सदस्य डॉ. जितेंद्र कानडे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त शिंदे कुटुंबीयांची विचारपूस केली. त्यांनी घराची पाहणी करून कुटुंबाला धीर दिला तसेच तातडीची मदत म्हणून रोख पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. तसेच शासन स्तरावर कळवून सर्वतोपरी शिंदे कुटुंबाला मदत करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, महसूल प्रशासनानेही या घटनेची दखल घेतली असून तलाठी श्री. गायकवाड यांनी नुकसानग्रस्त घराचा पंचनामा केला. शासनाच्या विविध योजनांतर्गत मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी माजी शिवसेना तालुकाप्रमुख बाळकृष्ण घोडके, अणदूर ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे, तलाठी श्री. गायकवाड विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बालाजी शिंदे ,उपसरपंच लक्ष्मण लबडे ,ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे,पोलीस नाईक अमोल मंकराज,कमलाकर सूर्यवंशी आदींसह गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शिंदे कुटुंबावर आलेल्या संकटामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

0 Comments