गुरुपौर्णिमेला गुरुभक्तीचा अनोखा सोहळा. ज्येष्ठ रामभक्त शकुंतला माई आवटे यांचा सन्मान.
------------------------------------------
'जय श्रीराम'च्या गजरात ज्येष्ठ रामभक्त शकुंतला माई आवटे यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार.
------------------------------------------
इटकळ (दिनेश सलगरे) :- "गुरू हा केवळ ज्ञानदाता नसून तो संस्कार, श्रद्धा आणि भक्तीचा अखंड झरा असतो." या भावनेचा प्रत्यय गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त मौजे बोरामणी येथे आला. श्री संत एकनाथ महाराज रचित श्री भावार्थ रामायण ग्रंथसेवेच्या प्रेरणास्थान, ज्येष्ठ रामभक्त श्रीमती शकुंतला माई आवटे यांचा उपस्थित शेकडो रामभक्तांच्या वतीने अत्यंत भक्तिमय वातावरणात यथोचित सत्कार करण्यात आला.बोरामणी येथे सुरू असलेल्या श्री भावार्थ रामायण ग्रंथसेवेची अखंड परंपरा जोपासण्यात शकुंतला माई आवटे यांचे मार्गदर्शन, प्रेरणा आणि निस्वार्थ योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या प्रेरणेतून अनेक महिला व रामभक्त ग्रंथश्रवण, रामनाम जप आणि धार्मिक कार्याशी जोडले गेले आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्या या अमूल्य सेवेला कृतज्ञतेची मानवंदना देण्यासाठी शाल, श्रीफळ अर्पण करून तसेच पेढा भरवून सन्मान करण्यात आला.सत्काराचा क्षण अविस्मरणीय ठरला. "जय श्रीराम... जय श्रीराम..." च्या अखंड जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. गुरुभक्ती, रामभक्ती आणि कृतज्ञतेच्या भावनेने भारावलेल्या वातावरणात अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात शकुंतला माईंच्या कार्याला सलाम केला.
यावेळी ग्रंथ निरूपणकार दिनेश सलगरे, रामभक्त शंकर वाघमोडे, शिवाजी सुरवसे, नरेश येलम, हरिभाऊ लकडे, पटणे मामा, तसेच सौ. महानंदाताई विभुते, सौ. मंगलताई करके, कुमारी रोहिणी विभुते, गाडेकर ताई यांच्यासह शेकडो रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.गुरुपौर्णिमेच्या दिवशी झालेला हा सन्मान सोहळा केवळ एका व्यक्तीचा सत्कार नसून गुरू-शिष्य परंपरेचा, रामभक्तीचा आणि भारतीय संस्कृतीतील कृतज्ञतेच्या भावनेचा गौरव असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

0 Comments