आषाढी एकादशीनिमित्त चिवरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची उत्साहपूर्ण बाल दिंडी; विठ्ठलनामाच्या गजरात गाव प्रदक्षिणा-Chivari ZP School News
चिवरी (प्रतिनिधी) बिभीषण मिटकरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक उत्साहात बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या वेशभूषेत सहभागी होत "ज्ञानबा-तुकाराम", "पांडुरंग हरी" अशा नामघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिमय केला.
बाल दिंडीची सुरुवात शाळेच्या प्रांगणातून करण्यात आली. त्यानंतर गावातील प्रमुख रस्त्यांवरून दिंडीची फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर अभंग व भजन म्हणत वारकरी परंपरेचे दर्शन घडविले. गावकऱ्यांनीही दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार, भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकात्मतेचे महत्त्व समजावून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. बालकांमध्ये सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी आणि भारतीय परंपरेची ओळख व्हावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या बाल दिंडीमध्ये शाळेतील सहशिक्षक श्री. कुंभार सर, श्री. सर्जे सर, श्री. सोनटक्के सर, श्रीमती पाटील मॅडम आणि श्रीमती कलशेट्टी मॅडम यांच्यासह शाळेतील कर्मचारी व सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. गावकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

0 Comments