चिवरीतील सौर प्रकल्पाच्या विस्ताराने भूमिहीन पशुपालक संकटात; चाऱ्याअभावी दुग्ध व्यवसायावर उपासमारीचे सावट- Landless cattle farmers in crisis due to expansion of solar project in Chivari; Dairy farming faces starvation due to lack of fodder
चिवरी (प्रतिनिधी) : धाराशिव जिल्ह्यात हरित ऊर्जेच्या नावाखाली पवनचक्की व सौर ऊर्जा प्रकल्पांचा झपाट्याने विस्तार होत आहे. हजारो कोटींची गुंतवणूक, वीज निर्मिती आणि विकासाच्या दाव्यांमुळे या प्रकल्पांचे स्वागत होत असले, तरी त्याचवेळी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या दुग्ध व्यवसायावर मोठे संकट ओढवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील शासकीय जमीनीवर उभारण्यात येत असलेल्या एसटी महामंडळाच्या प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पामुळे भूमिहीन पशुपालक, दुग्ध व्यवसायिक आणि शेळीपालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर शासकीय जमीन ताब्यात घेऊन त्या परिसराला तारकंपाऊंड करण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून गावातील गाई, म्हशी, शेळ्या आणि मेंढ्या या जमिनीवर मुक्तपणे चरायला जात होत्या. मात्र आता हे कुरण बंदिस्त झाल्याने हजारो जनावरांसाठी नैसर्गिक चाऱ्याचा प्रमुख स्रोत बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे.
चिवरी परिसरातील अनेक भूमिहीन कुटुंबांचा उदरनिर्वाह दुग्ध व्यवसाय आणि शेळीपालनावर अवलंबून आहे. विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांनी रोजगाराचा पर्याय म्हणून दुग्ध व्यवसाय स्वीकारला आहे. मात्र शासकीय कुरणच बंद झाल्यास पशुधनासाठी चारा मिळणे कठीण होणार असून, आधीच वाढलेल्या पशुखाद्याच्या दरामुळे अनेकांना जनावरे विकण्याची वेळ येऊ शकते. परिणामी दूध उत्पादनात घट होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
स्थानिक पशुपालकांच्या मते, हरित ऊर्जा प्रकल्पांमुळे वीज निर्मिती वाढत असली तरी पशुधन, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण उपजीविकेवर होणाऱ्या परिणामाकडे प्रशासन आणि धोरणकर्त्यांनी दुर्लक्ष केले आहे. ऊर्जा प्रकल्पांना मंजुरी देताना स्थानिक कुरण क्षेत्र, पशुधन आणि दुग्ध व्यवसायावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यात आला होता का? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, सौर प्रकल्पाला त्यांचा तत्त्वतः विरोध नाही. मात्र प्रकल्प उभारण्यापूर्वी पशुपालकांसाठी पर्यायी कुरण क्षेत्र राखीव ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा भूमिहीन पशुपालकांसमोर उपासमारीची वेळ येईल आणि दुग्ध व्यवसाय उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण होईल.
दरम्यान, सौर प्रकल्पामुळे शेती आणि पशुधन दोन्हीवर विपरीत परिणाम होणार असल्याचा दावा शेतकरी आणि पशुपालकांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन पशुपालकांसाठी पर्यायी चारा क्षेत्र उपलब्ध करून द्यावे किंवा हा प्रस्तावित प्रकल्प तालुक्यातील दुसऱ्या योग्य ठिकाणी स्थलांतरित करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास ग्रामस्थ, शेतकरी आणि पशुपालकांच्या वतीने तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
गावामध्ये अगोदरच तलाव प्रकल्पामुळे शेती क्षेत्र कमी झाली आहे त्यातच आता सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जनावरे चारण्यासाठी राखीव ठेवलेली जमिनी ही या प्रकल्पासाठी वापरली जात आहे यामुळे जनावरांना पूर्वी मोफत उपलब्ध होणारी कुरण व चारा क्षेञ कमी होणार असून पशुपालकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.याचा परिणाम केवळ दुग्ध व्यवसायावरच नव्हे तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो यामुळे हा प्रकल्प उभारण्यापूर्वी येथील भूमिहीन दुग्ध व्यवसायाचा विचार करावा.
राजु बनसोडे पशुपालक (चिवरी).

0 Comments