ब्राह्मी"चे भारतीय भाषांमध्ये रूपांतर करणाऱ्या अत्याधुनिक उपकरणाचे डिझाईन विकसित
--------------------------------------
संशोधक,अणदूरचे सुपुत्र डॉ. सचिन कंदले यांच्या कार्याचा गौरव
-------------------------
इटकळ (दिनेश सलगरे) :- भारतीय भाषांच्या जतन व संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या संशोधनामध्ये तुळजापूर तालुक्यातील अणदूरचे सुपुत्र तथा बीड येथील स्वा. सावरकर महाविद्यालयातील संस्कृत विभाग प्रमुख डॉ. सचिन चंद्रशेखर कंदले यांनी आपल्या सहकारी संशोधकांसह उल्लेखनीय यश संपादन केले आहे. छत्रपती संभाजी नगर येथील उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ पंकजा वाघमारे, डॉ सचिन कंदले यांच्यासह इतर तीन विषयतज्ञ व अध्यापकांचा समावेश असलेल्या संशोधन पथकाने ब्राह्मी लिपीचे भारतीय भाषांमध्ये रूपांतर करणारे अत्याधुनिक उपकरणाचे डिझाईन विकसित केले असून, या संशोधनामुळे प्राचीन शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखिते आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचे वाचन अधिक सुलभ होणार आहे. ब्राह्मी लिपीचे आधुनिक भारतीय भाषांमध्ये रूपांतर करणाऱ्या या नावीन्यपूर्ण उपकरणाच्या डिझाईन ला भारत सरकारने पेटंट जाहीर केले असल्याची माहिती डॉ. सचिन कंदले यांनी दिली.
उपकरण डिझाईन विकसित करण्यामधील इतर सहकारी संशोधक डॉ. पंकजा वाघमारे (सहसंचालक उच्च शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर),डॉ.आनंद रत्नपारखे, बीड ,प्रा. डॉ.अरुण चव्हाण, परळी ,विशाल सासवडे, छ. संभाजीनगर विकसित केलेले उपकरण डिझाईन हे ब्राह्मी लिपीतील मजकूर ओळखून त्याचे इतर भारतीय भाषांमध्ये रूपांतर करण्यास मदत करते. त्यामुळे इतिहास संशोधक, पुरातत्त्व विभाग, विद्यार्थी आणि संशोधन संस्थांना मोठा लाभ होणार आहे.
अणदूरचे सुपुत्र डॉ. सचिन कंदले यांच्या या कार्यामुळे गावासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचा गौरव वाढला आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यात भारतीय सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी हे संशोधन मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
डॉ. कंदले व त्यांच्या सहकारी संशोधकांच्या या अभिनव संशोधनामुळे भारतीय भाषा व प्राचीन ज्ञानपरंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे.
संशोधन क्षेत्रातील या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. सचिन कंदले व सर्व संशोधकांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

0 Comments