मुलं देण्याचे आमिष दाखवत तब्बल 47.88 लाखांची फसवणूक; ‘लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी, 8 जणांवर गुन्हा-Dharashiv Aanandnagar Police Station Crime
धाराशिव : मुलं देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन पद्धतीने तब्बल 47 लाख 88 हजार रुपये घेत फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार धाराशिव शहरात समोर आला आहे. एवढ्यावरच न थांबता लैंगिक अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनंजय दगडू मदने (वय ३८, रा. सांजा चौक, हनुमान मंदिर परिसर, धाराशिव) यांनी दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, सन २०२० पासून दि. १७ ऑगस्ट २०२६ पर्यंतच्या कालावधीत आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून मुलं देण्याचे आमिष दाखवले.
या आमिषातून आरोपींनी फिर्यादीकडून वेगवेगळ्या वेळी रोख २५ लाख ८८ हजार रुपये आणि ऑनलाइन माध्यमातून २२ लाख रुपये, अशी एकूण ४७ लाख ८८ हजार रुपयांची रक्कम घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, पैसे घेतल्यानंतरही आश्वासनाप्रमाणे मुलं न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. तसेच फिर्यादीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी अश्विनी श्रीराम पाटील, पार्वती उत्तम देवकते, भुजंग उत्तम देवकते, रेश्मा भुजंग देवकते (सर्व रा. कार्ला, ता. तुळजापूर), श्रीदेवी दत्ता नन्नवरे व दत्ता नन्नवरे (रा. येलमवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर), जयश्री धुळुबा शिरगिरे (रा. तेर, ता. जि. धाराशिव) आणि दत्ता गंडदे (रा. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंदनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 352, 351(2), 351(3) आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणात नेमकी फसवणूक कशी करण्यात आली, रकमेची देवाणघेवाण कोणत्या माध्यमातून झाली आणि आरोपींनी दिलेल्या आश्वासनामागील नेमका प्रकार काय होता, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

0 Comments