हुंड्यासाठी पैशांची मागणी; विवाहितेचा गळफास घेऊन आत्महत्या — पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा- धाराशिव जिल्ह्यातील घटना-DharashivCrime New Update
धाराशिव : माहेरहून वाहन घेण्यासाठी तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे घेऊन येण्याचा तगादा लावत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येडशी येथे घडली. या प्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत आरती धिरज पवार (वय 26, रा. येडशी, ता. जि. धाराशिव) यांनी 1 नोव्हेंबर 2022 पासून 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7.15 वाजेपर्यंतच्या कालावधीत सासरच्या मंडळींकडून त्रास सहन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीनुसार, आरती यांना माहेरहून गाडी घेण्यासाठी तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे घेऊन ये, अशी मागणी करण्यात येत होती. या कारणावरून त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली जात होती. तसेच वारंवार जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या सततच्या त्रासाला कंटाळून आरती पवार यांनी 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी येडशी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी आशा बाळासाहेब कदम (वय 40, रा. नारी, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी 14 ऑगस्ट रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीवरून पोलिसांनी धिरज श्यामसुंदर पवार, आशा श्यामसुंदर पवार आणि श्यामसुंदर उर्फ पोपट पवार (सर्व रा. येडशी, ता. जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम 108, 85, 351(1), 351(2), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे येडशी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, विवाहितेच्या आत्महत्येमागील परिस्थितीचा पोलीस तपास करीत आहेत.

0 Comments