शिवराजवर तलवारीचे ४९ वार; बहिणीला वाचवताना १६ वर्षीय भावाचाही बळी! बोरामणी ट्रिपल मर्डरमध्ये PM रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा-Murder Crime News Live
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील मस्के वस्तीवर घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला होता. वडिलोपार्जित जमिनीतील वाटा आणि हातउसने दिलेले २५ लाख रुपये परत मागण्याच्या वादातून दिराने वहिनी, पुतण्या आणि पुतणीची झोपेत असताना तलवारीने हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सोलापूर तालुका पोलिसांनी न्यायालयात तब्बल २८० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले असून, मृतदेहांच्या उत्तरीय तपासणी अहवालातून हत्येची क्रूरता समोर आली आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, मयत गायत्री सुधाकर मस्के या पतीच्या वाट्याची वडिलोपार्जित जमीन मागत होत्या. त्याचबरोबर त्यांनी शंकर ऊर्फ पप्पू मस्के याला दिलेले २५ लाख रुपये हातउसने परत करण्याची मागणीही केली होती. जमीन आणि पैशांवरून दोघांमध्ये सातत्याने वाद होत असल्याचे तपासात समोर आले आहे.
या वादातून शंकर मस्के याने १ मेच्या मध्यरात्री घराच्या गच्चीवर झोपलेल्या गायत्री मस्के, त्यांचा मुलगा शिवराज आणि मुलगी प्रियंका यांच्यावर तलवारीने हल्ला केल्याचा आरोप आहे.
शिवराजच्या शरीरावर तब्बल ४९ जखमा
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब उत्तरीय तपासणी अहवालातून समोर आली आहे. १६ वर्षीय शिवराजच्या शरीरावर तब्बल ४९ जखमा आढळल्या आहेत. तर गायत्री मस्के यांच्या शरीरावर १३ आणि प्रियंका यांच्या शरीरावर ६ जखमा असल्याचे PM रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, शंकरने गायत्री यांच्यावर हल्ला केल्यानंतर शिवराज झोपेतून जागा झाला. आईला वाचवण्यासाठी त्याने काकाला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्यावरही तलवारीने वार करण्यात आले.
बहिणीला वाचवण्यासाठी जखमी अवस्थेतही प्रतिकार
आईवर हल्ला झाल्यानंतर शिवराज स्वतः गंभीर जखमी झाला होता. मात्र, काका शंकर पुतणी प्रियंकाच्या दिशेने जात असताना शिवराजने पुन्हा त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेतही त्याने बहिणीला वाचवण्यासाठी पूर्ण ताकद लावली. मात्र, त्याचा हा प्रयत्न निष्फळ ठरला आणि या हल्ल्यात तिघांचाही मृत्यू झाला.
या घटनेमुळे शिवराजने मृत्यूपूर्वी आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी शेवटपर्यंत संघर्ष केला, अशी बाब तपासातून समोर आली आहे.
सहा आरोपींना अटक; दोघांना जामीन
या तिहेरी हत्याकांडप्रकरणी सोलापूर तालुका पोलिसांनी शंकर मस्के, त्याची पत्नी राणी, मुलगी दीक्षा, मुलगा धीरज, मेव्हणा सूरज माधवराव मोरे आणि त्याचा मित्र सचिन शिवाजी वाघमारे अशा सहा जणांना अटक केली होती.
यातील सूरज मोरे आणि सचिन वाघमारे यांना दोन दिवसांपूर्वी जामीन मिळाला असून, इतर संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती आहे.
२८० पानांचे दोषारोपपत्र; ३० साक्षीदार, ५० वस्तू जप्त
सोलापूर तालुका पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायालयात २८० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. तपासात पोलिसांनी ३० साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, गुन्ह्याशी संबंधित सुमारे ५० वस्तू जप्त केल्या आहेत.
जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये मृतांचे कपडे, घटनास्थळावरील तलवार, तलवारीची तुटलेली मूठ, चारचाकी वाहन, नेकलेस, ठुसी, मंगळसूत्र, बिलवर, अंगठी, गंठण, टॉप्स, कर्णफुले आणि गॉगलचे पॉकेट यांचा समावेश असल्याचे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
तसेच पोलिसांनी डॉक्टरांचे अहवाल, संशयित आरोपींचे सीडीआर आणि बँक स्टेटमेंट यांसह विविध कागदपत्रे आणि पुरावे न्यायालयात सादर केले आहेत.
आता जिल्हा न्यायालयात खटल्याची सुनावणी
दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आता या बहुचर्चित तिहेरी हत्याकांडाच्या खटल्याची जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत बाजू मांडणार आहेत.
जमिनीचा हिस्सा आणि २५ लाख रुपयांच्या आर्थिक व्यवहारातून सुरू झालेला वाद अखेर तिहेरी हत्याकांडात बदलला. या प्रकरणातील न्यायालयीन सुनावणीत पोलिसांनी सादर केलेले वैद्यकीय, तांत्रिक आणि भौतिक पुरावे तसेच साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे ठरणार आहेत.

0 Comments