मुलीचा बालविवाह; लैंगिक अत्याचारातून मुलाचा जन्म, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल -Naldurg Police Station Crime News
धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील एका गावातील 13 वर्षे 1 महिना वयाच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात बालविवाहासह लैंगिक अत्याचाराच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी (नाव व गाव गोपनीय) अल्पवयीन असतानाच 2024 पासून आजपर्यंतच्या कालावधीत नमूद आरोपींनी संगनमत करून तिचा एका तरुणासोबत बालविवाह लावून दिल्याचा आरोप आहे. विवाहानंतर संबंधित तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या अत्याचारातून मुलगी गर्भवती राहिली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर पीडितेने 14 ऑगस्ट 2026 रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली.
पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम 64(2)(एम), 65(1), बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील कलम 9, 10 तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) अधिनियमातील कलम 4, 5(जे)(2), 6 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

0 Comments