मौजे इटकळ येथे श्रावण मासारंभानिमित्त श्री. सुंदरकांडास भक्तिमय वातावरणात प्रारंभ.
"""''''""""""""""""""""""""""""""""""""""
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री. भावार्थ रामायणातील ४२ अध्यायांचे वाचन व निरूपण; रामभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (ता. तुळजापूर) : पवित्र श्रावण मासारंभाचे औचित्य साधून मौजे इटकळ येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संत एकनाथ महाराज लिखित श्री. भावार्थ रामायण ग्रंथातील सुंदरकांडाचे वाचन व निरूपण सेवेस मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. श्रावण महिनाभर सुंदरकांडातील एकूण ४२ अध्यायांचे वाचन, निरूपण व रामनामाचा जागर करण्यात येणार आहे.गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता रामभक्त नागनाथ स्वामी यांच्या हस्ते श्री. भावार्थ रामायण ग्रंथाचे विधिवत पूजन करून सुंदरकांड वाचन सेवेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित रामभक्तांनी श्रीराम नामाचा जयघोष करत या धार्मिक उपक्रमाचे स्वागत केले.
सुंदरकांड म्हणजे श्रीरामभक्ती, श्रद्धा, धैर्य आणि सेवाभावाचा अद्भुत संगम मानला जातो. हनुमंताच्या अतुलनीय भक्तीचे, पराक्रमाचे आणि प्रभू श्रीरामांवरील अखंड निष्ठेचे दर्शन सुंदरकांडातून घडते. संकटसमयी धैर्य न सोडता प्रभूच्या नामस्मरणाने कार्य सिद्धीस नेण्याची प्रेरणा सुंदरकांड देते. त्यामुळे सुंदरकांडाचे श्रवण केल्याने मनाला शांती, भक्तीला बळ आणि जीवनाला सकारात्मक दिशा मिळते, अशी श्रद्धा रामभक्तांमध्ये आहे.यावेळी बोलताना रामभक्त नागनाथ स्वामी यांनी सांगितले की, “ग्रामीण भागामध्ये धार्मिक व आध्यात्मिक कार्याला बळकटी मिळावी, प्रत्येकाच्या मनात रामनामाची गोडी निर्माण व्हावी आणि समाजामध्ये भक्ती, संस्कार व एकोप्याची भावना वाढीस लागावी, या उद्देशाने श्रावण मासाचे औचित्य साधून सुंदरकांड वाचन व निरूपणाचे आयोजन करण्यात आले आहे.”
दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत श्री. भावार्थ रामायणातील सुंदरकांडाचे वाचन व निरूपण करण्यात येणार आहे. या भक्तिमय उपक्रमाचा लाभ परिसरातील रामभक्त, भाविक महिला-भगिनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सुंदरकांडाच्या पहिल्याच दिवशी रामभक्त नागनाथ स्वामी, रामभक्त दिनेश सलगरे, गणेश बिराजदार, काशिनाथ पांढरे, विश्वनाथ गायकवाड, प्रकाश पांढरे, अविनाश वाघमारे यांच्यासह महिला भगिनी व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.“रामनामाचा गजर, सुंदरकांडाचे श्रवण आणि भक्तीचा जागर—यामुळे इटकळ नगरीत श्रावण मास भक्तिमय वातावरणात सुरू झाला आहे.”

0 Comments