बोअरवेलच्या पाण्यावरून दाम्पत्याला मारहाण; लोखंडी रॉड-काठीने हल्ला-Tuljapur Taluka Crime News
सावरगावातील तिघांविरुद्ध तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
धाराशिव | प्रतिनिधी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे बोअरवेलचे पाणी घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका दाम्पत्याला शिवीगाळ करून लाथाबुक्यांसह लोखंडी रॉड व काठीने मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.३० वाजता सावरगाव येथे ही घटना घडली. फिर्यादी धनाजी भारत काळे (वय ३७, रा. सावरगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) हे आपल्या पत्नीसह बोअरवेलचे पाणी घेण्यासाठी गेले असता, आरोपी अनिकेत नाना कोळी, नाना कोळी आणि लखन कोळी (सर्व रा. सावरगाव) यांनी पाणी घेण्याच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपींनी धनाजी काळे व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी तसेच लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण केली, त्यामुळे दोघेही जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, घटनेनंतर फिर्यादी धनाजी काळे यांनी दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली. त्यावरून तामलवाडी पोलिसांनी अनिकेत नाना कोळी, नाना कोळी व लखन कोळी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 115(2), 352 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

0 Comments