गंधोरा येथे सोनटक्के कुटुंबीयांत तुंबळ हाणामारी; कोयता, लोखंडी रॉड, काठ्या अन् दगडांचा वापर, दोन्ही गटांवर गुन्हे दाखल
नळदुर्ग पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी; गंभीर जखमी केल्याचा आरोप, जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद
नळदुर्ग प्रतिनिधी : तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथे सोनटक्के कुटुंबीयांमध्ये पाण्याची मोटार नेण्याच्या कारणावरून वाद विकोपाला जाऊन तुंबळ हाणामारी झाल्याची घटना दि. 28 ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, नळदुर्ग पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणात गंधोरा येथील बाबुराव मारोती सोनटक्के (वय 65) यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 9 वाजता पाण्याची मोटार घेऊन गेल्याच्या कारणावरून आरोपींना विचारणा केली असता, आरोपी महादेव डिगंबर सोनटक्के, बालाजी विजय सोनटक्के, विठ्ठल दत्तात्रय सोनटक्के, डिगंबर बन्सीलाल सोनटक्के, पांडुरंग डिगंबर सोनटक्के, सुनिता डिगंबर सोनटक्के आणि साधु डिगंबर सोनटक्के यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण केल्याचा आरोप आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच कोयता, लोखंडी रॉड, काठी आणि दगडाने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी बाबुराव सोनटक्के यांनी दि. 30 ऑगस्ट रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 109(1), 118(1), 115(2), 189(2), 190, 191(2)(3), 352, 351(2) आणि 333 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, याच घटनेच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या गटाकडूनही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पांडुरंग डिगंबर सोनटक्के (वय 28) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 6 वाजता गंधोरा येथे आरोपी खेलु बाबुराव सोनटक्के, बाबुराव मारुती सोनटक्के, हिराकांत बाबु सोनटक्के व इतर पाच इसमांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या आई-वडिलांसह चुलत भावाला शिवीगाळ केली.
त्यानंतर लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉड, काठी आणि दगडाने मारहाण करून जखमी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीवरून पांडुरंग सोनटक्के यांच्या दि. 30 ऑगस्ट रोजीच्या प्रथम खबरेवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 115(2), 189(2), 190, 191(2), 352 आणि 351(2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटनेमुळे गंधोरा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पाण्याच्या मोटारीच्या कारणावरून सुरू झालेला वाद हाणामारीपर्यंत पोहोचल्याने पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींची नोंद केली असून, पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.

0 Comments