जिल्हास्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
धाराशिव : आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव संचलित श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने संस्थापक प्रेरणास्थान गुरुवर्य कै. के. टी. पाटील (बप्पा) यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेस धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने नावनोंदणी केली असून, आणखीही अनेक विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संपर्क साधत आहेत.
यावर्षी स्पर्धेसाठी "धाराशिवच्या शैक्षणिक क्रांतीचे शिल्पकार आणि त्यांचे योगदान : कै. गुरुवर्य के. टी. पाटील (बप्पा)", "सोशल मीडिया : जोडलेलं जग व हरवलेली नाती", "पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकास : आजची गरज, उद्याची जबाबदारी", "डिजिटल युग आणि सायबर सुरक्षेचे आव्हान" तसेच "नैतिक मूल्ये, संस्कार आणि आजचा आधुनिक समाज" हे विषय निश्चित करण्यात आले आहेत. समकालीन व सामाजिक जाणीवा जागृत करणाऱ्या या विषयांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला असून प्रभावी वक्तृत्व सादर करण्यासाठी स्पर्धक तयारी करत आहेत.
स्पर्धेची प्राथमिक फेरी गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता, तर अंतिम फेरी शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (जुनी इमारत), धाराशिव येथे होणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी रु. १५,०००, द्वितीय क्रमांकासाठी रु. ११,०००, तृतीय क्रमांकासाठी रु. ७,००० अशी रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार असून, उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना प्रत्येकी रु. २,००० व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
इच्छुक स्पर्धकांनी आपली नावनोंदणी मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत निश्चित करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी प्रा. डॉ. डी. व्ही. जाधव (८६६८५८९१६१), प्रा. डी. वाय. घोडके (९८५००००७९२), प्रा. सचिन तेली (९१७५८०४१५०), प्रा. प्रसाद माशाळकर (७५८८९३६६३७), प्रा. सौ. एल. टी. भोसले (७०२८३५८२९९) तसेच प्रा. सौ. ए. बी. तुंगीकर (७३५०९५७४४५) यांच्याशी संपर्क साधावा.
विद्यार्थ्यांमध्ये या स्पर्धेबाबत मोठा उत्साह असून, ही स्पर्धा त्यांच्या वक्तृत्वकला, आत्मविश्वास, विचारशक्ती आणि सामाजिक जाणीवा अधिक समृद्ध करणारी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

0 Comments