वादळी वाऱ्यासह पावसाने तीन एकर ऊस जमीनदोस्त; केशेगावच्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान.
--------------------------------------
*पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.*
----------------------------------------
इटकळ (दिनेश सलगरे) :- तुळजापूर तालुक्यातील मौजे केशेगाव येथील शेतकरी मुरलीधर शिवाजी शिनगारे यांचा सुमारे तीन एकरांतील पंधरा कांड्यावरील ऊस नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे जमीनदोस्त झाला असून, या नैसर्गिक आपत्तीत त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
यंदा पावसाने आधीच पाठ फिरवल्याने ग्रामीण भागातील बळीराजा संकटात सापडला आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्याने आणि पावसाने ऐन बहरात आलेले उसाचे पीक अक्षरशः आडवे पडले. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.उसाचे पीक उभे करण्यासाठी केलेला मोठा खर्च, मजुरी आणि वर्षभराची मेहनत एका झटक्यात वाया गेल्याने शेतकरी मुरलीधर शिनगारे यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. या नुकसानीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.दरम्यान, संबंधित महसूल व कृषी विभागाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत आणि शासनाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

0 Comments