ग्रीन सिटी स्कूलच्या विद्यार्थ्यांची तायक्वांदो स्पर्धेत दमदार कामगिरी; दोघांना सुवर्ण, दोघांना रौप्य पदक
वेळापूरच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत मिळवले उल्लेखनीय यश; संस्थाचालक व शिक्षकांकडून अभिनंदन
अकलुज : सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून पिलेव येथे आयोजित करण्यात आलेल्या शालेय तायक्वांदो स्पर्धेत संत सावतामाळी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ग्रीन सिटी इंग्लिश मीडियम स्कूल, वेळापूरच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत चार पदके पटकावली आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या स्पर्धेत यशश्री भगत हिने २२ ते २४ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. तसेच वैष्णवी भगत हिने २६ ते २९ किलो वजन गटात प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रथम क्रमांक व सुवर्णपदक मिळवले.
याशिवाय आदित्य कदम याने ३२ ते ३५ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकावले. तसेच मेघराज माने-देशमुख यानेही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक व रौप्यपदक मिळवले.
विद्यार्थ्यांनी तायक्वांदो स्पर्धेत दाखवलेल्या कौशल्यपूर्ण कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नियमित सराव, शिस्त, मेहनत आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांना हे यश मिळाल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संत सावतामाळी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र गिरमे (रंजन भाऊ), सचिव तसेच सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापिका प्रतीक्षा भडके मॅडम आणि मुख्य क्रीडा प्रशिक्षक उद्धव जाधव सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुका क्रीडा अधिकारी रणजीत लोहार उपस्थित होते. त्यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
ग्रीन सिटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रासोबतच क्रीडा क्षेत्रातही आपल्या गुणवत्तेची छाप पाडत चार पदके मिळवल्याने शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे आगामी स्पर्धांमध्येही ते अधिक आत्मविश्वासाने सहभागी होतील, असा विश्वास शिक्षक व पालकांनी व्यक्त केला.

0 Comments