देवाच्या मूर्तीची पेटी घरी नेण्यावरून वाद; वृद्धासह कुटुंबीयांना लाथाबुक्क्यांनी, दगड व लोखंडी काठीने मारहाण-
अचलेर तांडा येथे गैरकायद्याची मंडळी जमवून हल्ला; सहा जणांविरुद्ध मुरुम पोलिसांत गुन्हा
लोहारा : देवाच्या मूर्तीची पेटी घरी घेऊन जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 65 वर्षीय वृद्धासह त्यांचा मुलगा व पत्नी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, लोखंडी काठी व दगडाने मारहाण केल्याची घटना अचलेर तांडा येथे घडली. याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बासु केशव चव्हाण (वय 65), रा. अचलेर तांडा, ता. लोहारा, जि. धाराशिव यांच्यासोबत हा प्रकार घडला. दि. 12 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास अचलेर तांडा येथे देवाच्या मूर्तीची पेटी घरी घेऊन जाण्याच्या कारणावरून आरोपी व फिर्यादी यांच्यात वाद झाला.
या वादातून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी बासु चव्हाण तसेच त्यांचा मुलगा व पत्नी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच लोखंडी काठी आणि दगडाने मारहाण करून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेबाबत बासु चव्हाण यांनी दि. 24 सप्टेंबर 2026 रोजी मुरुम पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तुकाराम धरु चव्हाण, चेतन चंदु चव्हाण, भीम धारु चव्हाण, सोनम तुकाराम चव्हाण, सुरताबाई चंदु चव्हाण आणि मानताबाई भीम चव्हाण, सर्व रा. अचलेर, ता. लोहारा, जि. धाराशिव, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 189(2), 190, 191(2) व 191(3) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास मुरुम पोलीस करीत आहेत.

0 Comments