उमरग्यात ‘पुस्तक वाचणाऱ्या गणरायाची’ प्रतिष्ठापना; गणरायाला पुस्तकांचा प्रसाद, भाविकांनाही पुस्तकांची भेट-Umerga Breaking News- Daily
चव्हाण वाचनालयाचा अनोखा उपक्रम; श्रद्धेसोबत ज्ञान, विचार आणि वाचनसंस्कृतीचा जागर
उमरगा, दि. १४ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सव म्हटले की भक्ती, आरती आणि प्रसादाची परंपरा डोळ्यांसमोर येते. मात्र, उमरगा शहरातील प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय तथा ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवाला ज्ञान आणि वाचनसंस्कृतीची अनोखी जोड देण्यात आली आहे. वाचनालयाच्या संपर्क कार्यालयात यंदाही ‘पुस्तक वाचणाऱ्या गणरायाची’ विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
गणरायाच्या प्राणप्रतिष्ठापना आणि पहिल्या आरतीच्या कार्यक्रमाला मातोश्री शांताबाई चव्हाण, प्रा. राजू बटगिरे, ॲड. ख्वाजा शेख, ॲड. अर्चना जाधव, मयूर कटके, कविता साळी, संतोष चव्हाण, किशोर बसगुंडे यांच्यासह ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य तसेच वाचनप्रेमी उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना करून उपस्थितांच्या हस्ते पहिली आरती करण्यात आली.
ॲड. शीतल शामराव चव्हाण यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मूळ गावी प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाची सुरुवात केली आहे. या माध्यमातून नागरिक, विद्यार्थी आणि तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. सण-उत्सवांना सामाजिक प्रबोधन आणि वाचन चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.
भारतीय संस्कृतीत गणरायाला बुद्धी, विद्या आणि विवेकाची देवता मानले जाते. याच विचारातून वाचनालयात दरवर्षी पुस्तक वाचणाऱ्या गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. गणरायाला पारंपरिक नैवेद्याबरोबरच पुस्तके अर्पण करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
भाविकांना प्रसाद म्हणून पुस्तके
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पारंपरिक प्रसादाऐवजी पुस्तकांचा प्रसाद देण्यात येणार आहे. गणरायाला अर्पण झालेली पुस्तके उत्सवानंतर वाचनालयाच्या संग्रहात समाविष्ट करून वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे एका व्यक्तीने गणरायाला अर्पण केलेले पुस्तक पुढे अनेक वाचकांपर्यंत पोहोचणार असून, ज्ञानाचा हा प्रसाद समाजात सातत्याने वाटला जाणार आहे.
“हा केवळ धार्मिक उत्सव नसून विद्येचा, विचारांचा, विवेकाचा आणि वाचनसंस्कृतीचा उत्सव आहे. श्रद्धेला ज्ञानाची आणि उत्सवाला सामाजिक प्रबोधनाची जोड देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. नागरिकांनी गणरायाला आपल्या आवडीची पुस्तके अर्पण करून वाचन चळवळीला बळ द्यावे,” असे आवाहन वाचनालयाचे संस्थापक ॲड. शीतल शामराव चव्हाण यांनी केले.
गणेशोत्सवाच्या कालावधीत विद्यार्थी, पालक, शिक्षक, नागरिक आणि पुस्तकप्रेमींनी वाचनालयाला भेट देऊन ‘पुस्तक वाचणाऱ्या गणरायाचे’ दर्शन घ्यावे, गणरायाला पुस्तकांचा प्रसाद अर्पण करावा आणि स्वतःही पुस्तकांचा प्रसाद स्वीकारावा, असे आवाहन वाचनालय व ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments