इटकळ -केशेगाव रस्त्यावर भरधाव दुचाकी मैलाच्या दगडाला धडकली; एकाचा मृत्यू, एक जनाविरुद्ध गुन्हा दाखल
धाराशिव (प्रतिनिधी) : दुचाकी हायगयी व निष्काळजीपणे चालविल्याने ती रस्त्यालगतच्या मैलाच्या दगडाला धडकून झालेल्या अपघातात मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी इटकळ ते केशेगाव रस्त्यावरील साई मंगल कार्यालयासमोर घडली. या प्रकरणी दुचाकी चालविणाऱ्या राहुल पंडित नकाते याच्याविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल पंडित नकाते आणि त्यांची चुलती ललिता सुरेश नकाते (वय ४८, रा. काटगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) हे दोघे ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता एमएच २५ एटी १०५१ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून प्रवास करीत होते. इटकळ ते केशेगाव रस्त्यावरील साई मंगल कार्यालयासमोर आल्यानंतर दुचाकी चालक राहुल नकाते याचे वाहनावरील नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्यावरील मैलाच्या दगडाला धडकली.
या अपघातात दुचाकीच्या मागील सीटवर बसलेल्या ललिता नकाते या खाली पडून गंभीर जखमी झाल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे नकाते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी महेश सुरेश नकाते (वय २७) यांनी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दुचाकी चालक राहुल पंडित नकाते याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१ आणि १०६(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातप्रकरणी नळदुर्ग पोलीस पुढील तपास करीत आहेत.

0 Comments