पिकअपची दुचाकीला समोरून धडक;मंगरुळ येथील २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू-Mangurul Road Accident News
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे पिकअप वाहनाने दुचाकीला समोरून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शिवशंकर वामनराव लबडे (वय २२, रा. मंगरुळ, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मंगरुळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर लबडे हे १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता मोटारसायकलवरून जात होते. त्याचवेळी पिकअप क्रमांक १३ आर ८५८९ च्या चालकाने वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चुकीच्या दिशेने चालवून शिवशंकर यांच्या मोटारसायकलला समोरून जोराची धडक दिली.
या अपघातात शिवशंकर लबडे गंभीर जखमी झाले. मात्र, या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी शशांक राजकुमार कोरेकर (वय २३, रा. मंगरुळ, ता. तुळजापूर) यांनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पिकअप चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब), १०६(१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघाताबाबत तुळजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

0 Comments