उमरग्याची स्वरा चव्हाण पुन्हा आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेच्या मंचावर!
थायलंडमध्ये रौप्यपदक पटकावल्यानंतर आता इंडोनेशियातील बाली येथे कलाविष्कार; अवघ्या नऊव्या वर्षी स्वराची आंतरराष्ट्रीय भरारी!Umerga Live News Daily
उमरगा | प्रतिनिधी : उमरग्याच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा रोवणारी बालनृत्यांगना स्वरा शीतल चव्हाण आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेच्या मंचावर आपली कला सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. इंडोनेशिया देशातील बाली येथे दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडियाज इंटरनॅशनल ग्रूव्हफेस्ट (IIGF) २०२६’ या आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेत स्वरा सहभागी होत आहे. अवघ्या नऊ वर्षांच्या वयात दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नृत्य सादरीकरणाची संधी मिळाल्याने स्वराची ही कलाक्षेत्रातील भरारी उमरग्यासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा विषय ठरत आहे.
थायलंडमध्ये रौप्यपदकाची कमाई!
गतवर्षी २५ ते २८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान थायलंडमधील पटाया येथे आयोजित करण्यात आलेल्या १५ व्या ‘कल्चरल ऑलिम्पियाड ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स (COPA) २०२५’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्वरा चव्हाण हिने समूह नृत्यप्रकारात सहभागी होत रौप्यपदक पटकावले होते. विशेष म्हणजे, याच स्पर्धेत तिचे वडील, सामाजिक कार्यकर्ते व विधिज्ञ ॲड. शीतल शामराव चव्हाण यांनी ‘शिवतांडव’ हे एकल नृत्य सादर करून कांस्यपदक मिळवले होते. पिता आणि कन्या या दोघांनीही एकाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदके पटकावून उमरग्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता.
आंतरराष्ट्रीय यशानंतर राष्ट्रीय स्पर्धेतही सहभाग!
थायलंडमधील उल्लेखनीय यशानंतर ॲड. शीतल चव्हाण आणि स्वरा चव्हाण या पिता-कन्येने पुणे येथे आयोजित राष्ट्रीय नृत्यस्पर्धेतही सहभाग नोंदवला. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील या अनुभवातून स्वराच्या नृत्यकलेला अधिक प्रगल्भता लाभत आहे. सातत्यपूर्ण सराव, कलेविषयीची आवड आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्वराने अल्पावधीतच नृत्यक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने आश्वासक वाटचाल सुरू केली आहे. स्वराच्या या कलात्मक जडणघडणीत पुणे येथील फ्लॉलेस डान्स अकॅडमीच्या नृत्यशिक्षिका व नृत्यदिग्दर्शिका भक्ती जाधव-वरखेडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, तिच्या नृत्यक्षेत्रातील या यशस्वी वाटचालीत त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.
आता बालीच्या आंतरराष्ट्रीय मंचावर!
यंदा इंडोनेशियातील बाली येथे होणाऱ्या ‘इंडियाज इंटरनॅशनल ग्रूव्हफेस्ट २०२६’ या आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेसाठी स्वराची सहभागाची नोंद झाली असून, आयोजक पदन्यास एंटरटेनमेंट यांच्या वतीने तिला अधिकृत स्वागतपत्रही प्राप्त झाले आहे. विविध देशांतील नृत्यकलावंतांना एकत्र आणणाऱ्या या व्यासपीठावर स्वराला आपली नृत्यकला सादर करण्याची संधी मिळणार आहे. विविध संस्कृती, कलापरंपरा आणि नृत्यशैलींचा संगम असलेल्या या आंतरराष्ट्रीय मंचावरील तिच्या सादरीकरणाकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.
सामाजिक कार्यातून उमरग्याची ओळख; आता नव्या पिढीची सांस्कृतिक भरारी!
ॲड. शीतल चव्हाण यांनी वाचनसंस्कृतीचा प्रसार, ग्रामीण भागातील ग्रंथालय चळवळ, सामाजिक उपक्रम आणि वैचारिक लेखनाच्या माध्यमातून उमरगा परिसराची ओळख राज्य व देशपातळीवर निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रातील या वाटचालीला कलाक्षेत्राचीही जोड देत त्यांनी स्वतः आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवले. आता त्यांची कन्या स्वरा ही त्याच आत्मविश्वासाने नृत्यक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करीत आहे.
थायलंडमधील रौप्यपदकानंतर आता इंडोनेशियातील आंतरराष्ट्रीय नृत्यस्पर्धेत स्वरा कोणती छाप पाडते, याकडे उमरगावासीयांचे लक्ष लागले आहे. तिच्या या नव्या सांस्कृतिक भरारीबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून कौतुक व शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

0 Comments