Hot Posts

6/recent/ticker-posts

वसंत ऋतुच्या स्वागतासाठी बहुगुणी पळस बहरला

चिवरी ता.तुळजापुर  येथील महालक्ष्मी मंदिराच्या डोंगरावरील टिपलेले छायाचित्र

 धाराशिव:  पळसाचा अस्तावर जाळ, अस्तांच्या कंठात.....माणकांची माळ....! नेमकं काहीसं असंच दृश्य सध्या धाराशिव जिल्ह्यातील बालाघाटच्या डोंगर रांगेमध्ये, सर्वत्र दिसत आहे. वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी जिल्ह्यातील विविध भागात बहरलेला पळस जणू काही फ्लेम ऑफ फॉरेस्ट दिसत आहे.उन्हाळ्याच्या दिवसांची चाहूल लागताच, फ्लेम ऑफ दि फॉरेस्ट म्हणून ओळखल्या जाणार्‍या पळसाची पानगळ होऊन लाल रंगाची फुले फुलत आहेत. जिल्ह्यातील विविध डोंगर रांगेमध्ये शेंदूर सजला आहे, वसंताचा कैफ माळरानी उजला, शिशिराची पानगळ संपत आली की वसंताच्या स्वागतासाठी दूर दूर माळरानी पळसफुले अंगोपांगी बहरून डवरून तोरण लावतात. चराचरात उन्हाची काहिली भरलेली असताना ही शेंदूरफुले मात्र वसंतोत्सव साजरा करत असल्याचे नेत्रदिपक दृश्य सध्या धाराशिव जिल्ह्यातील सर्वच भागात पहायला मिळत आहे.

बहुगुणी पळसाचे महत्व-२०-२५ फूट उंच असणाऱ्या पळसाला संस्कृतमध्ये पलाश म्हणतात. कुठेही गेले तरी पळसाला पाने तीनच, अशी म्हण प्रचलित आहे. पानझडीत सर्व पाने गळून गेल्यावर पळसाला फुलांचे घुमारे फुटतात. पळसाची पानेही फार उपयोगी आहेत. पूर्वी या पानांपासूनच मोठ्या पंगतीला जेवण देण्यासाठी द्रोण आणि पत्रावळ्या बनविल्या जात. आता काळ बदलला तसे मोठ्या समारंभामध्ये कागदी पत्रावळ्याचा वापर होत आहे.

धूलिवंदनाला रंग बनविण्यासाठी पळसाच्या फुलांचा वापर केला जात असे,  धूलिवंदनाला एकमेकांच्या अंगावर टाकण्यासाठी उपयोगात येणारा रंग बनविण्यासाठी पळसाच्या फुलांचा वापर केला जात असे. आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणूनही याचा वापर होत असे. पळसाची फुले पाण्यात टाकून स्नान केले तर त्वचारोग नाहीसा होतो, असेही आयुर्वेदात म्हटले आहे. पळसाच्या बियांचाही औषधीसाठी वापर केला जातो. अशा बहुगुणी आणि त्यांच्याकडे लक्ष जाताच पाहणाऱ्याच्या डोळ्यांना भुरळ घालणारा पळस सध्या लाल गडद झाला आहे.  



Post a Comment

0 Comments