Hot Posts

6/recent/ticker-posts

जळकोट येथे हिटरचा स्फोट होऊन शाळकरी मुलीचा मृत्यू| A school girl died in a heater explosion in Jalkot

जळकोट येथे हिटरचा स्फोट होऊन शाळकरी मुलीचा मृत्यू|     A school girl died in a heater explosion in Jalkot    


तुळजापुर : तालुक्यातील जळकोट येथे दिनांक ८ एप्रिल २०२३ रोजी पहाटे पाणी तापवण्याचे हिटर चालू करून तिघी मायलेकी हिटर लावलेल्या खोलीतच झोपी गेल्या होत्या. त्यातच हिटरचा स्फोट होऊन उकळते पाणी अंगावर पडून बाजूलाच झोपलेल्या आई व दोन मुली गंभीर भाजल्याने तिघींना तात्काळ सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार चालू असताना दिनांक १३ एप्रिल रोजी मोठी मुलगी कु. अभिलाषा संतोष लोखंडे वय १४ वर्षे ( इयत्ता ८ वी ) हिचा मृत्यू झाल्याने मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .

याबाबत वृत्त असे की, तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील संतोष नारायण लोखंडे वय ४० वर्षे यांचे कुटुंब मानमोडी रोडकडे असलेल्या वस्तीमध्ये स्वतःच्या घरात राहत आहे. दिनांक ८ एप्रिल  रोजी शनिवारी लवकर उठून आवरण्यासाठी पहाटे ४:०० वाजता इलेक्ट्रिक हिटर लावून झोपी गेले. हिटर लावलेल्या खोलीतच सौ. वैशाली संतोष लोखंडे वय 34 वर्षे, मुलगी कु. अभिलाषा संतोष लोखंडे वय १४ वर्षे, आणि दुसरी मुलगी कु. जागृती संतोष लोखंडे वय १२ वर्षे या तिघी झोपल्या होत्या. तर शेजारच्या खोलीत संतोष लोखंडे हे झोपले होते. पहाटे हिटर मधील पाणी जास्त तापल्याने हीटरचा स्फोट होऊन बाजूलाच झोपलेल्या तिघी मायलेकी ७० ते ८० टक्के भाजल्या होत्या, तातडीने तिघींना सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र दोन्ही मुलींसह आईची प्रकृती चिंताजनक सांगितली जात होती. त्यातच दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी कु. अभिलाषा लोखंडे हिचा सकाळी ९:०० वाजता  मृत्यू झाल्याची बातमी जळकोट येथे कळल्याने लोखंडे कुटुंबीयांसह संपूर्ण जळकोट गावावर शोककळा पसरली. जिल्हा परिषद प्रशाला जळकोट येथे इयत्वीता ८ वी मध्ये शिकत असलेल्या कोवळ्या कळीचा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

याबाबत दिनांक ८ एप्रिल रोजी सोलापूर येथील रुग्णालयाच्या पोलीस चौकीत सदर घटनेची नोंद झाली असून संबंधित नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे गुन्हा वर्ग करण्यात येणार असल्याचे समजते. अभिलाषाचा मृतदेह सायंकाळी ७:०० वाजता जळकोट येथे आणून भीम नगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसरी मुलगी कु. जागृती लोखंडे वय १२ वर्षे व आई वैशाली लोखंडे वय ४० वर्षे या दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेने परिसरात  सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Post a Comment

0 Comments