परीक्षास्थळी सॅंडल मधून लपून आणला मोबाईल, परीक्षार्थीस अटक कृषी विभागातील भरतीत प्रकार
नाशिक : ऑनलाइन परीक्षा केंद्रावर एका परीक्षार्थी नी मोबाईल सह इलेक्ट्रॉनिक डिवाइस सॅंडल मधील लपून आणल्याचा प्रकार समोर आला आहे. कृषी विभागाच्या वतीने वरिष्ठ लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत हा धक्कादायक प्रकार घडला असून बहुचर्चित तलाठी भरती पेपर फुटी पाठोपाठ ही घटना घडल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून जालना जिल्ह्यातील संबंधित परीक्षार्थी तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, सुरज विठ्ठल सिंग जारवाल वय (२३)रा. जारवालवाडी तालुका बदनापूर असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या शुक्रवारी कृषी विभागाच्या वरिष्ठ लिपिक या पदासाठी राज्यभरात ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. शहरातही विविध केंद्रावर ही परीक्षा पार पडली मात्र म्हसरूळ परिसरातील पुणे विद्यार्थीगृह ह्या महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला आहे. ऑनलाइन परीक्षा असल्याने सर्वच केंद्रावर परीक्षार्थीची अंग झडती घेण्यात आली. यावेळी पर्यवेक्षकाच्या नजरेतून संशयीत सुटला नाही. अंग झडतीत संशयताच्या पायातील सॅंडलला चोर कप्पा असल्याचे समोर आले. या चोर कप्प्यात मोबाईल व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आढळून आले. हा प्रकार पर्यवेक्षकांनी परीक्षा प्रमुखाच्या निदर्शनात आणून दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहोचला. याप्रकरणी ऋषिकेश गोकुळ कांगणे यांनी फिर्यादी केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे तपास करीत आहेत.
0 Comments