Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव : रब्बी हंगामातील ज्वारी,मका व हरभरा पिकांवरील किडरोगांचे व्यवस्थापन

धाराशिव : रब्बी हंगामातील ज्वारी,मका व हरभरा पिकांवरील किडरोगांचे व्यवस्थापन

धाराशिव,दि.07: जिल्ह्याचे रब्बी हंगाम पीक पेरणीचे एकूण 4 लक्ष 11 हजार 170 हेक्टर एवढे सर्वसाधारण क्षेत्र आहे.7 डिसेंबरपर्यंत एकूण 2 लक्ष 66 हजार 867 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. 

 जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच सततच्या ढगाळ वातावरणामुळे काही भागात रब्बी ज्वारी/मका पिकावर नवीन लष्करी अळीचा तसेच हरभरा पिकांवर मररोग व घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे क्षेत्रीय भेटी दरम्यान निदर्शनास आले आहे.या किडरोग नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना न केल्यास येणाऱ्या पुढील कालावधीत या किडरोगांचा पिकावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट येण्याची दाट शक्यता आहे.


रब्बी ज्वारी/मका पिकावरील नवीन लष्करी अळी नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना:

               पीक 30 दिवसाचे असल्यास बारीक़ वाळू व चुन्याचे 9:1 प्रमाण करून पोंग्यात टाकावे.मोठ्या अळ्या हाताने वेचून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून नष्ट कराव्यात. सामूहिकरित्या मोठ्या प्रमाणात नर पतंग आकर्षित करून मारावेत.यासाठी 15 कामगंध सापळे प्रती एकरी लावावेत.

 रब्बी ज्वारी पिकाच्या रोपावस्था ते सुरवातीची पोंग्याची अवस्था (अंडी अवस्था) या कालावधीत 5 टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास पिकावर 5 टक्के निंबोळी अर्क किंवा 50 मिली अझाडीरॅक्टीन (1500 पीपीएम) प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 मध्यम ते शेवटची पोंग्याची अवस्था (दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळ्या ) या कालावधीमध्ये 10 ते 20 टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास 4 ग्रॅम इमामेक्टीन बेंझोएट (5 टक्के डब्ल्युएजी) किंवा 3 मिली स्पिनोसॅड (45 टक्के एससी) किंवा 5 मिली थायामिथॉक्झाम 12.6 टक्के + लॅमडा साहॅलोथ्रिन 9.5 टक्के झेडसी किंवा 4 मिली क्लोरॅनट्रानिलीप्रोल 18.5 टक्के एससी प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून पोंग्यात फवारणी करावी.

 शेवटच्या अवस्थेतील अळ्या या कालावधीमध्ये विषारी अमिषाचा वापर करावा. यासांठी दहा किलो साळीचा भुसा व 2 किलो गुळ 2-3 लिटर पाण्यात मिसळून 24 तास सडण्यासाठी ठेवावे.या द्रावणाचा वापर करण्याच्या अर्धा तास अगोदर यामध्ये 100 ग्रॅम थायोडीकार्ब 75 डब्ल्युजी मिसळावे व हे आमिष पोंग्यामध्ये टाकावे . 

हरभरा पिकावरील किड व रोग नियंत्रणासाठी करावयाच्या रासायनिक उपाययोजना :


घाटेअळी : पुर्ण वाढलेल्या अळ्यांची संख्या सरासरी चौ. मिटर क्षेत्रात 2-3 आढळल्यास किडीचे नियंत्रण करावे. त्यासाठी  5 टक्के निंबोळी अर्क किंवा एनपीव्ही 250 एल.ई. प्रती हेक्टर याप्रमाणे 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

         नर पतंगाचा नाश करण्यासाठी फेरोमेन ट्रॅप्स प्रती हेक्टरी 15 बसविण्यात यावे. पिकांमध्ये 2-3 फुट उंचीवर एकरी 20 पक्षी थांबे लावावेत.

               ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकांची अंडी असलेले कार्ड दर 20 मीटर अंतरावर अडवून ठेवावे. तद्नंतर ही अळी नियंत्रणात आली नाही तर क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 20 ईसी 25 मिली. किंवा स्पिनोसॅड 45 एस. सी. 4 मिली. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 एस.जी. 4 ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 एससी 2.5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.


मररोग :हा रोग जमिनीतून उद्भवणाऱ्या बुरशीमुळे होतो. त्यासाठी रोगप्रतिकारक जातीची लागवड करणे. निरोगी बियाण्याचा वापर किंवा थायरम किंवा बाविस्टीन या बुरशीनाशकांची 2.5 ग्रॅम प्रती किलो बियाण्यास प्रक्रिया करणे. रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करणे.

अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी कार्यालयास संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments