Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतिकारी पत्रकारिता आणि सद्यस्थिती :-ॲड. शीतल शामराव चव्हाण

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतिकारी पत्रकारिता आणि सद्यस्थिती :-ॲड. शीतल शामराव चव्हाण 



काय करु आता धरुनिया भीड|

नि:शंक हे तोंड वाजविले ||

नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण |

सार्थक लाजून नव्हे हित ||


सन १९२० साली दलित, पिडीत आणि शोषितांच्या वेदनेला वाचा फोडण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'मूकनायक' हे पाक्षिक सुरु केले. या पाक्षिकाचे ब्रीद म्हणून त्यांनी वर उल्लेख केलेला संत तुकोब्बारायांचा अभंग घेतला. या जगी कुणी मुकीयांचा (गरीबी, शोषण आणि अविद्येमूळे मुक्या झालेल्यांचा) नायक नाही, त्यामूळे आता भीडभाड ठेवून चालणार नाही. आता नि:शंकपणे अन्यायी, विषम व्यवस्थेविरुद्धचा विद्रोह व्यक्त करणे भाग पडत आहे असा आशय या अभंगातून व्यक्त होतो. मध्ययुगातील तुकोब्बारायांच्या प्रबोधनाचा वारसा पुढे नेत आधुनिक काळात एका दलित समाजातील उच्चविद्याविभूषित तरुण मुक्यांचा नायक होवू पाहतो आणि विषमतावादी व्यवस्थेवर प्रहार करायला आपली लेखणी चालवतो ही घटनाच मूळी क्रांतिकारी होती. अतिशय खडतर परिस्थितीतही बाबासाहेबांनी 'मूकनायक' हे पाक्षिक त्या काळात चालवले. ते काही कारणांनी बंदही झाले. पुढे १९२७ साली बाबासाहेबांनी 'बहिष्कृत भारत' सुरु केले. 


"आता कोंडद घेऊनि हाती। आरूढ पांइये रथी।

देई अलिंगन वीरवृत्ती। समाधाने।

जगी कीर्ती रुढवी। स्वधर्माचा मानु वाढवी।

इया भारापासोनि सोडवी। मेदिनी हे।

आता पार्थ निःशंकु होई। या संग्रमा चित्त देई।

एथ हे वाचूनी काही। बोलो नये। आता केवळ संग्राम।

संग्रामाशिवाय दुसरे काहीही नाही।"


आता लढण्यावाचून दुसरा पर्याय नाही असा आशय व्यक्त करणारी ज्ञानेश्वरीतील ओवी उधृत करीत बाबासाहेबांनी निर्भीड बाण्याने या देशातील वर्ण, वर्ग आणि लिंग विषमतेच्या समर्थकांना एकाचवेळी अंगावर घेत 'बहिष्कृत भारत' मधून आपली क्रांतिकारी लेखणी चालवली. 

‘गुलामाला तु गुलाम आहेस असे सांगा म्हणजे तो बंड करून उठेल’ अशी बंडाची भाषा करणारे १९३० साली बाबासाहेबांनी सुरु केलेल्या 'जनता' या पाक्षिकाचे ब्रीद होते. १९२० साली सुरु केलेल्या 'मूकनायक' पासून ते १९५६ सालच्या 'प्रबुद्ध भारत'पर्यंत बाबासाहेबांनी अतिशय खडतर परिस्थितीत, इतर सगळे व्याप सांभाळून आणि अनेक आर्थिक अडचणींचा सामना करीत तब्बल ३६ वर्ष पत्रकारितेच्या माध्यमातून मुक्यांचा, बहिष्कृतांचा, या देशातील सर्वसामान्य जनतेचा आवाज बनण्याचे आणि या देशाला प्रबुद्ध करण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून केले. 

महात्मा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णराव भालेकर व नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुरु केलेले 'दीनबंधू' असो; बाबासाहेबांचे 'मूकनायक', 'बहिष्कृत भारत', 'जनता', 'प्रबुद्ध भारत' असो, हैद्राबाद संस्थानातील शोएब-उल्ला-खान यांचे 'इमरोज' असो, आगरकरांनी टिळकांशी वाद घालत पत्रकारितेच्या माध्यमातून मांडलेला विज्ञानवादी, मानवतावादी, सुधारणावादी विचार असो, द टाईम्स ऑफ इंडिया, द हिंदू च्या माध्यमातून भारतीय राष्ट्रवादाच्या विचारांची झालेली पेरणी असो या सगळ्या पत्रांनी विविध काळात दबलेल्या, पिचलेल्या जनतेच्या मनातील उद्रेकाला वाचा फोडत परिवर्तनवादी भूमिका घेतली.

आता इतर क्षेत्रांप्रमाणे भारतातील मुख्य प्रवाहातील पत्रकारिताही बाजारु झालेली आहे. तिच्यात क्रांतिकारी आशय तर उरला नाहीच पण वस्तुस्थिती निर्भीडपणे मांडण्याची सचोटीही उरली नाही. आता इथली पत्रकारिता मुख्यत्वे करुन उद्योगपती आणि सत्ताधारी यांचे 'मार्केटींग' करणारी 'एजंसी'  बनली आहेत. 

अशा परिस्थितीतही भारतातल्या एकेकाळच्या क्रांतिकारी पत्रकारितेचा वारसा काही अंशी 'सोशल मिडिया'वरील मुक्त पत्रकार आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील मूल्यांचे भान ठेवून काम करणारी, नवनवे प्रयोग करु पाहणारी काही माणसं जपत आहेत. समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी परिवर्तनाचा विचार थेटपणे मांडणारी प्रभावी माध्यमं आवश्यक असतात. ही आवश्यकता पूर्ण करणारे मुक्त पत्रकार असोत अथवा बाजारुपणाला बळी न पडता धडपडणारे तरुण असोत, त्यांच्या पाठीशी सर्वप्रकारे बळ उभे करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

१९ व्या शतकाच्या सुरुवातीला बाबासाहेब मुक्यांचे नायक झाले होते. आता काळ अजूनच आव्हानात्मक आहे. आता सगळे कळूनही न बोलणारे किंवा काही कळाले नसल्याचा आव आणणारे, दिसूनही काही न दिसल्याच्या अविर्भावात वावरणारे, झोपेचे सोंग घेतलेले तथाकथित सुशिक्षित आहेत. व्यवस्थेकडून झालेल्या अन्यायाची मनात दाबून ठेवून हतबलपणे जगणारे श्रमिक, शेतकरी आहेत. या सगळ्यांना चेतवण्यासाठी पत्रकारितेने अधिकाधिक तीक्ष्ण, प्रखर आणि परखड होणे आवश्यक आहे. तथाकथित सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडून लोकांच्या मनातील आक्रोशाला वाचा फोडण्याचा हा काळ आहे. ही जबाबदारी केवळ पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांवर टाकून जमणार नाही. ती प्रत्येक लिहू, बोलू आणि विविध प्रकारे व्यक्त होवू शकणाऱ्यांनी संपूर्ण ताकतीने पार पाडायची आहे. 


© ॲड. शीतल शामराव चव्हाण 

(मो.9921657346)

Post a Comment

0 Comments