तुळजापूर : भरधाव बोलेरोची दुचाकीला धडक; आपसिंगा येथील 23 वर्षीय युवकाचा मृत्यू,तर एकजण जखमी-Tuljapur Motorcyle Accident News
📍 तुळजापूर | प्रतिनिधी : तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा शिवारात झालेल्या भीषण अपघातात 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भरधाव व निष्काळजीपणे चालवलेल्या बोलेरो जीपने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
या घटनेबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सृष्टीराज उर्फ रोहित बाळासाहेब सोनवणे (वय 23, रा. अपसिंगा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) आणि त्यांचा मित्र रोहन हिराचंद रोकडे हे दोघे दि. 27 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.30 वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरून जात होते. यावेळी टाटा सामाजिक संस्थेच्या पाटीमागे सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर, अपसिंगा शिवारात समोरून येणाऱ्या बोलेरो जीप (क्र. MH 25 AJ 5681) ने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.
ही बोलेरो जीप विशाल बळवंत क्षिरसागर (रा. अपसिंगा) चालवत होता. त्याने वाहन हायगतीने व निष्काळजीपणे चालवल्यामुळे अपघात झाल्याचे समोर आले आहे.
या अपघातात सृष्टीराज उर्फ रोहित सोनवणे यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर रोहन रोकडे यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी फिर्यादी बाळासाहेब भिमराव सोनवणे (वय 47, रा. अपसिंगा) यांनी दि. 31 मार्च 2026 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरोधात भा.न्या.सं. कलम 281, 125 (अ)(ब), 106 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस पुढील तपास करत असून, या अपघाताच्या घटनेमुळे अपसिंगा परिसरात शोककळा पसरली आहे.

0 Comments