मौजे निलेगाव येथील शेतमजुरांच्या घरातील मुलगी बनली पुणे शहर पोलिस.

Hot Posts

6/recent/ticker-posts

मौजे निलेगाव येथील शेतमजुरांच्या घरातील मुलगी बनली पुणे शहर पोलिस.

मौजे निलेगाव येथील शेतमजुरांच्या घरातील मुलगी बनली पुणे शहर पोलिस.


""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

 निलेगावच्या मंजुषा कोळी यांची यशोगाथा प्रेरणादायी

-----------------------------------------


 इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापूर तालुक्यातील मौजे निलेगाव येथील शेतमजूर कुटुंबातील कु. मंजुषा दशरथ कोळी यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पोलिस दलात यश मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. अनेक सामाजिक रूढी-परंपरांना बाजूला ठेवत शिक्षणाला प्राधान्य देत त्यांनी आपला वेगळा मार्ग तयार केला.

तुळजापूर आणि अक्कलकोट तालुक्याच्या सीमेवरील निलेगाव हे गाव असून, येथे अनेक मुली प्राथमिक शिक्षणानंतर शिक्षण थांबवतात. मात्र मंजुषा कोळी यांनी या परिस्थितीला न जुमानता नळदुर्ग येथील बालाघाट महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला.समाजात महिला व मुलींवर वाढत असलेले अत्याचार पाहून त्यांनी पोलिस दलात भरती होण्याचा निर्धार केला. त्यासाठी पुणे येथे नातेवाईकांकडे राहून त्यांनी पोलिस भरतीची कठोर तयारी केली. 

नियमित मैदानावरील सराव, अभ्यास आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी पोलिस भरती परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करत पुणे शहर पोलिस दलात कॉन्स्टेबल पदावर निवड मिळवली.निलेगाव येथील पोलिस दलात निवड होणारी ती पहिलीच महिला असल्यामुळे गावात तिचे विशेष कौतुक होत आहे. तिच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी पार्थ जमादार, अर्जून जमादार, लक्ष्मण बंदीछोडे, ओम जमादार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कु.मंजुषा कोळी यांचे यश हे ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरत असून जिद्द आणि मेहनत असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.

Post a Comment

0 Comments